नेरुर : 11 केव्हीच्या वीज वाहिनीच्या पोलवरून पडला तो. उच्च दाब वाहिनीचा विद्युत पोल व त्याची पाहणी करताना सहा.पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे व ग्रामस्थ. pudhari photo
सिंधुदुर्ग

नेरूर येथे विजेचा धक्का लागून कंत्राटी कर्मचारी जखमी

जखमी कर्मचार्‍याची औषधोपचाराची जबाबदारी महावितरणने घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : फॉल्टी फिडरवरील दोष शोधण्यासाठी महावितरणच्या 11 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनी पोलावर चढलेला महावितरणचा आऊटसोर्सिंग कर्मचारी वैभव दत्ताराम ठाकूर (29, रा. नेरूर ठाकूरटेंब) हा विजेचा धक्का लागून खाली पडला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आलेे. गुरूवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास ही घटना नेरूर- जकात येथे घडली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत जखमी कर्मचार्‍याची औषधोपचाराची जबाबदारी महावितरणने घ्यावी, अशी मागणी केली आहे.

वैभव ठाकूर हा वीज कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. नेरूर गावात गेले दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामागील दोेष शोधण्यासाठी वैभव उच्च दाब वीज वाहिनीच्या पोलवर चढला होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा फिडर फॉल्टी होता. यातील दोष शोधण्याचे काम चालू होते.

वैभव ठाकूर व बागवे हे दोघे वायरमन हा दोष शोधण्याचे काम करत होते. यादरम्यान वैभव ठाकूर याला विजेचा धक्का बसल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ कुडाळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्याला त्वरित गोवा-बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नेरूर ग्रामस्थ, आजी माजी लोकप्रतिनिधींनी धाव घेतली. वीज पुरवठा बंद असताना विजेचा धक्का कसा बसला? यामुळे असे विचारत ग्रामस्थ आक्रमक झाले व त्यांनी महावितरणचे कार्यकारी अधिकारी वनमोरे यांच्या कार्यालयाला धडक दिली. जखमी कर्मचार्‍याचा औषध उपचाराचा सर्व खर्च महावितरणचे करावा. जोपर्यंत हा कर्मचारी ठीक होत नाही तोपर्यंत सर्वतोपरी जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला. नेरूर सरपंच भक्ती घाडी, माजी सरपंच शेखर गावडे, पं. स. माजी सदस्य संदेश नाईक, राजू पटेकर, अंकूश ठाकूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मचार्‍यांप्रति महावितरण उदासीन!

सद्यस्थितीत महावितरणची पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत. यासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहे. मात्र, कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी महावितरण उदासीन आहे का, असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित होत आहे.

याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांच्याशी संपर्क हा प्रसंग नेमका कसा घडला हे आता सांगता येत नाही. महावितरणच्या तंत्रज्ञांमार्फत याठिकाणची तपासणी करण्यात येणार आहे व त्यांचा अहवाल प्राप्त होताच निश्चित कारण स्पष्ट होणार आहे.
श्री. वनमोरे, कार्यकारी अभियंता- महावितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT