राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात स्वागत 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात स्वागत

जिल्हा पोलिस दल, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तुतारी, ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमार्फत आयोजित राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे आगमन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे स्वागत करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तुतारी आणि ढोल-ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून रॅलीतील सहभागी पोलिस अधिकारी व रायडर्स यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधून आलेले पोलिस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या घोषवाक्याद्वारे अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि अमली पदार्थमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

बांदा येथील स्वागत कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा येथून आलेल्या सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले. अमली पदार्थांविरोधातील लढा ही आजच्या काळाची गरज असून, भावी पिढीने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. देश अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीला जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रॅलीत सहभागी झालेल्या तसेच आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन करून सर्व रायडर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील पुढील प्रवासाला सुरुवात होताना मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला.

जिल्ह्यातील कुडाळ हायस्कूल, पुष्पसेन ज्ञानपीठ, हुमरमळा तसेच जिल्हा मुख्यालय परिसरासह विविध ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधातील लढ्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे तरुण पिढीपर्यंत हा संदेश पोहोचविण्यास मदत झाली. अमली पदार्थांचे व्यसन व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर गंभीर परिणाम घडवते. त्यामुळे तरुणाईला या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती आणि सामाजिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT