कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौकातून मोठ्या प्रमाणात वाळू व चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर आणि ट्रकची दररोज वर्दळ सुरू असून, त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. मंगळवारी सकाळी पोस्ट ऑफिस चौकात वाळू वाहतूक करणारा डंपर आणि मोटारसायकल यांच्यात होणारा अपघात सुदैवाने थोडक्यात टळला. मोटारसायकलस्वार आणि डंपर चालक या दोघांनीही प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास घडली. मालवण रस्त्याकडून गोव्याच्या दिशेने जाणारे तीन ते चार वाळू वाहतूक करणारे डंपर पोस्ट ऑफिस चौकात एकामागोमाग आले. त्याचवेळी कुडाळ बसस्थानकाच्या दिशेने जाणारी एसटी प्रवासी उतरविण्यासाठी येथील थांब्यावर थांबली होती. दरम्यान, एसटीला ओव्हरटेक करून एक मोटारसायकल पुढे आली. त्याचवेळी डंपर चालकाने वेगाने मुख्य रस्त्यावर डंपर घेतल्याने मोटारसायकलस्वारासमोर अचानक डंपर आला. प्रसंगावधान राखत मोटारसायकलस्वाराने वाहनावर नियंत्रण मिळविले, तर डंपर चालकानेही वेळेत ब्रेक लावल्याने दोन्ही वाहनांची धडक थोडक्यात टळली. या घटनेनंतर संतप्त मोटारसायकलस्वाराने डंपर चालकाला खडे बोल सुनावले.