Narayan Rane pudhari photo
सिंधुदुर्ग

महासत्तेच्या वाटचालीत मराठा समाजाचेही योगदान हवे

खा. नारायण राणे : सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : समाजातील मतभेद विसरा आणि विकासासाठी योगदान द्या. सिंधुदुर्गातील मराठा उद्योजक होऊ इच्छिणारी नवी पिढी यांना एकाच व्यासपीठावर आणत त्यांना आणखी बळ द्या. समाज येतो तेथे राजकारण असू नये, समाजातील तरुण पिढीला पुढे आणले पाहिजे. गरीब, कुपोषित, आजारी, बेरोजगार अशा गांजलेल्या समाज बांधवांना मदतीचा हात देऊन पुढे घेतले पाहिजे. मराठ्यांचे नेतृत्व तयार केले पाहिजे. तेव्हाच खर्‍या अर्थाने समाज सेवा घडेल. भारत महासत्तेकडे झेप घेत असताना मराठा समाजाचेही योगदान असायला हवे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मराठा मंडळ कणकवली येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत ते मार्गदर्शन करत होते. प्रा. जी. ए. सावंत, डॉ. चंद्रकांत राणे, प्रभाकर सावंत, विजय सावंत, तुळशीदास रावराणे, अ‍ॅड. उमेश सावंत, शशी सावंत तसेच मंडळाचे अन्य मान्यवर उपस्थित होते. खा. राणे म्हणाले, सर्व क्षेत्रात मराठा समाज पुढे असला पाहिजे. मुंबई मध्ये 22 टक्के मराठी माणूस होता. तो टक्का कमालीचा घसरला आहे. त्यात मराठा किती आहेत, हे शोधले पाहिजे. आपला मराठा समाज पुढे नेण्याचे ध्येय ठेवताना भाऊबंदकीच्या भांडणांना बाजूला सारले पाहीजे. समाजातील यशस्वी व्यक्तिमत्त्वाना प्रोत्साहित केले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वसाधारण सभेदरम्यान, समाजाप्रती मोठे योगदान देण्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष खा.नारायण राणे यांच्या हस्ते उद्योजक विजय सावंत, डॉ. चंद्रकांत राणे, प्रा.जी.ए.सावंत, आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त स्नेहलता राणे, आर्किटेक संतोष तावडे, आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रसाद राणे, उद्योजक बी. डी. सावंत, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाम सावंत, तसेच वैद्यकीय क्षेत्रात यश मिळविलेले सर्जन डॉ. मानसी बिरमोळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शाम सावंत यांनी तर प्रास्ताविक सरचिटणीस शशी सावंत यांनी केले.

समाजातील युवकांसाठी चर्चासत्र ठेवा

मराठा समाजातील युवकांसाठी चर्चासत्र ठेवा. आपण त्यात भाग घेऊ. नव्या पिढीला नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करू. मोबाईल कोणत्या कामासाठी वापरावा हे शिकवू. दरडोई उत्पादन वाढवण्यासाठी काय करावे यावर चर्चा करू. उद्योजक घडवूया. तेव्हाच मराठा समाजाची प्रगती होईल. समाजासाठी काम करणार्‍यांना पुढे घ्या. जे वेळ देऊ शकत नाहीत त्यांना पदावरुन बाजूला करा. मराठा समाजाची इमारत नव्याने बनविण्यासाठी यावेळी सूचना खा. नारायण राणे यांनी दिल्या.

छत्रपतींचे विचार अंगी केव्हा बाणवणार!

छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि स्वराज्य उभे केले. त्यासाठी मोठे कष्ट घेतले. अहोरात्र मेहनत केली. त्यांनाही समाजाकडून त्रास झाला; पण तो त्यांनी बाजूला केला.आपण त्यांची जयंती साजरी करतो...अगदी धूमधडाक्यात, म्हणजे झाले का? त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा घेऊन आपण उभे कधी होणार आहोत, असा सवाल खा. राणे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT