कणकवली : शिंदे शिवसेनेत कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर माझी परवानगी लागेल, असे सांगणारे खा. नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत की शिवसेनेचे संपर्कप्रमुख आहेत? असा खोचक सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला.
वैभव नाईक किंवा आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री असताना विधायक कामांसाठी भेटत होतो. परंतु नारायण राणे भाजपचे खासदार असून एकनाथ शिंदेंना 100 वेळा का भेटत होते? थोरल्या मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी ते शिंदेंना किती वेळा भेटले? हे राणेंनी जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान श्री. उपरकर यांनी दिले.
आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, 2005 च्या पोटनिवडणुकीमध्ये नारायण राणे यांना पाडण्यासाठी 100 लोक घेऊन त्यावेळी ठाण्यातून एकनाथ शिंदे व कार्यकर्ते आले होते, हे राणेंनी विसरु नये.
ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली, त्यावेळी राणे हे काँग्रेसच्या नेत्या प्रभा राव व नेत्यांना भेटत होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना अनेकदा भेटले. गुजरातला कोणाकोणाला भेटायला जात होते? राणेंनी पक्षांतर केले ते स्वत:च्या स्वार्थासाठी आणि राजकीय पुनर्वसनासाठी केले, असा आरोप उपरकर यांनी केला.
ते म्हणाले, ज्यावेळी राणे अडचणीत आले त्यावेळी त्यांनी भाजप प्रवेशासाठी काय काय केले? हे आम्हाला माहीत आहे. स्वत:च्या मुलाचा भाजप प्रवेश होण्यासाठी राणेंना किती वेळ फडणवीसांनी थांबवून ठेवले होते, हे राणे यांनी आठवावे. त्यानंतर मुलाचा प्रवेश भाजपचे माजी आ. प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत झाला होता, हे राणेंनी विसरु नये.
परशुराम उपरकर म्हणाले, राणे यांनी काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात एक डेअरी आणली होती, त्या दूध डेअरीने शेतकर्यांकडून दूध घेऊन अडीच कोटी रुपये अद्यापही शेतकर्यांना दिलेले नाहीत. हे शेतकर्यांचे पैसे वसूल करुन देण्याची जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली होती. त्यांनी गोशाळा सुरु करण्यापूर्वी या शेतकर्यांना पैसे देऊन न्याय मिळवून द्यावा, असे उपरकर म्हणाले.
शिंदे शिवसेनेतील संपर्कमंत्री तथा पक्षातील दोन नंबर मंत्री असलेले नेते उदय सामंत यांना कोणाला पक्षात घ्यायचे याचा अधिकार नसेल, तर ना. सामंतांसोबत शिंदे शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्त्यांवर विचार करण्याची वेळ आली आहे,असा टोला उपरकर यांनी लगावला.