कणकवली ः कणकवलीतील पत्रकार परिषदेत खा. नारायण राणे यांनी शिंदे शिवसेनेत अलीकडेच प्रवेश केलेले माजी आ. राजन तेली व भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा जोरदार समाचार घेतला. राजन तेली यांना प्रतिष्ठा आहे काय? असा सवाल करत तेलींवर तोफ डागली. त्याचवेळी विशाल परब आपणास भेटू दे, ब्रेकिंग न्यूज मिळेल, त्याला वाचवायला कोणीही येवू दे असा थेट इशाराही त्यांनी दिला. या दोन्ही माणसांचे भाजपशी आपण संबंध मानत नाही, त्यांचे म्हणणे ग्राह्य धरत नाही, त्याला आपण विरोधच करेन असेही त्यांनी स्पष्ट केले.
कणकवली येथे खा.नारायण राणे यानी पत्रकार परिषदेत घेतली. यात युतीबाबत आपली भुमिका मांडताना माजी आमदार राजन तेली आणि सावंतवाडीतील भाजपचे नेते विशाल परब यांच्यावर त्यांनी टीका केली. राजन तेली यांच्या म्हणण्यानुसार काही प्रतिष्ठित व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहर विकास आघाडीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्याच्या भुमिकेबाबत खा. राणे यांचे लक्ष वेधले असता खा. राणे म्हणाले, प्रतिष्ठित नागरीकांमध्ये स्वतः राजन तेली बसत नाही, त्याला स्वतःला प्रतिष्ठा पाहिजे ना, सगळ्यांनी टाकून दिलेला एकनाथ शिंदेंनी का स्विकारला हेच समजत नाही, आपण एकनाथ शिंदेंना भेटणार आहे असा टोला खा. राणे यांनी लगावला. राजन तेली हे कुठलाही पदाधिकारी आणि नेता नाही. त्याला आपण मानत नाही असेही खा.राणे म्हणाले.
राजन तेली यांनी गेल्या महिन्यात ठाकरे शिवसेनेकडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आता ते कणकवली तालुक्यात सक्रीय झाले आहेत. त्याच दरम्यान भाजपशी बंडखोरी केलेले विशाल परब यांनीही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला असून दोन दिवसापूर्वी त्यांच्या पक्षीय कार्यालयाचे उद्घाटन सावंतवाडी येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या उपस्थितीत झाले होते. या पार्श्वभूमीवर खा.राणे यांनी विशाल परब यांना इशारा दिला आहे. खा. राणे यावेळी म्हणाले, सावंतवाडीचा तो विशाल परब, काय त्याचं ऑफीस, फार मोठा नेता समजतो, विचारवंत असल्यासारखा वागतो. त्याने भाजपवर खूप टिका केली आहे. तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटु दे, त्याच्या ऑफीसमध्ये असला तरी, मग तुम्हाला ब्रेकींग न्यूज कळेल, त्याला वाचवायला कोणीही येवू दे असा इशारा खा.राणे यांनी दिला. उपजिल्हा रूग्णालयांमधील रूग्णवाहीकांना डिझेल मिळत नसल्याने काही ठिकाणी त्या उभ्या आहेत याकडे खा. राणे यांचे लक्ष वेधले असता याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्वाही खा. राणे यांनी दिली.
खा. नारायण राणे यांनी राज आणि उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. उध्दव ठाकरे यांच्या शेती नुकसान पाहणी दौऱ्याचा संदर्भ घेत खा. राणे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी अडिच वर्षात मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काहीच केले नाही. त्यांचे अस्तित्व संपले आहे. राज आणि उध्दव ठाकरे केवळ अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र आले आहेत. सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्येही नाही. 25 वर्षात मुंबई मनपाची सत्ता असताना उध्दव ठाकरे यांनी मुंबईचा काय कालापालट केला असा सवालही खा. राणे यांनी केला.