देवगड : ‘बा देवा दर्याराजा, यावर्षी मासळी व्यवसायाला बरकत दे! असे साकडे घालत मच्छीमार बांधवांनी अथांग सागराला वंदन करत श्रीफळ अर्पण केले. शुक्रवारी नारळी पौर्णिमेच्या औचित्यावर सागराला नारळ अर्पण करून देवगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नारळीपौर्णिमा उत्साहात पारंपरिक थाटात साजरी करण्यात आली.
दरम्यान, सागरी मासेमारी 31 जुलै रोजी संपली असली, तरी शुक्रवारपासूनच खोल समुद्रातील मासेमारीला खर्या अर्थाने सुरूवात झाली. देवगड येथे तारामुंबरी, मळई, देवगड समुद्रकिनारा, कुणकेश्वर, विजयदुर्ग अश्या सर्वच ठिकाणी स्थानिक मच्छीमारांनी सागराला नारळ अर्पण करत मासेमारीच्या नव्या हंगामाचा उत्साही प्रारंभ केला.
देवगड बंदर येथील कार्यक्रमास तहसीलदार रमेश पवार, उद्योगपती नंदकुमार घाटे, पोलिस निरिक्षक भरत धुमाळ, कस्टम निरिक्षक एस्.व्ही.पेडणेकर, बंदर विभागाचे मुकूंद खुडे, सागर सुरक्षा रक्षक संतोष ठुकरूल, शिवराम निकम, बाळा कोळंबकर, संजय पराडकर, सतिश खानविलकर तसेच शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक व मच्छिमार आदी उपस्थित होते.
त्यानंतर हा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. जामसंडे -मळई खाडीकिनारीही बाल मंडळ संगीत मेळा मळईतर्फे सागराला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. मळई खाडीमध्ये मच्छिमारी नौकांनाही पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.मच्छीमारांनी यावेळी नवा मासेमारी हंगाम बरकतीचा व सुख शांततीचा जाऊदे, मच्छीमारांच्या जीवनाचे रक्षण कर, अशी प्रार्थना करत मनोभावे आपले श्रीफळ दर्याराजाला अर्पण केले.
मळई ग्रामस्थ श्रीकांत मेस्त्री यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती, गार्हाणे करून नौकांमधुन मळई ग्रामस्थ व मच्छिमारांनी सागराला नारळ अर्पण केला.
मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर, प्रदोष कोयंडे, जयप्रकाश कोयंडे, रूपेश मणचेकर, सचिन मुणगेकर, अजित कोयंडे, मोहन कोयंडे, सुरेश मणचेकर, अनिकेत कोयंडे, हेमंत मणचेकर, नासीर खान, सतीश कोयंडे, बाळकृष्ण राजम, बाळकृष्ण भाबल, सुनील कोयंडे, प्रभाकर कोयंडे, दिलीप कोयंडे, गुरूप्रसाद मेस्त्री, महेश पांचाळ, सुदाम कोयंडे, शिवराज कोयंडे, समीर मेस्त्री आदी मळई ग्रामस्थ मच्छिमार व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तारामुंबरी येथे सागराला सुवर्णश्रीफळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. सायंकाळी 5 वा. तारामुंबरी विठ्ठलमंदीराकडून सुवर्णश्रीफळ व कलशासह भव्य मिरवणुक काढण्यात आली.
मासेमारी करणार्या होड्यांची रंगरंगोटी केल्याने होड्या सजल्या होत्या. शिवाय, काही होड्यांवर केलेली झेंडे-पताक्यांची बहारदार सजावटही आकर्षक होती. महिलांनी तयार केलेल्या चवदार नारळाचे पदार्थही लक्षवेधी ठरले. कोकणातील मच्छीमारांचा हा दिवस म्हणजे त्यांच्या जीवनातील आनंदाची पर्वणीच असते, म्हणूनच या दिवशी पूर्ण कोकण बहरून जातो.