कुडाळ : येथील रेल्वेस्थानकात मुंबईला जाण्यासाठी आलेले चाकरमानी, प्रवासी.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Mumbai Workers Return Journey | मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला!

जिल्हाभरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर तुडूंब गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : गणेशोत्सवासाठी गावी दाखल झालेले मुंबईकर चाकरमानी दीड, पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव साजरा करून हे चाकरमानी मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर चाकरमानी प्रवाशांची गर्दी दिसत आहे. मुंबईकडे जणार्‍या सर्वच रेल्वे गाड्या गर्दीने धावू लागल्या आहेत.

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेसह एसटी प्रशासनाकडून ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमानी गणेशभक्तांची चांगली सोय झाली तर दुसरीकडे सुट्ट्यांचे नियोजन करून, अजूनही मुंबईकर चाकरमानी गावी दाखल होत आहेत.

सिंधुदुर्गासह तळकोकणात गणेशोत्सवाचा माहोल सुरू असून, गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे व अन्य भागात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले कोकणवासिय चाकरमानी, आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. लाखाेंंच्या संख्येने चाकरमानी व गणेशभक्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आता दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे कुडाळ, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली आदी प्रमूख रेल्वे स्थानकांवर मुंबईला परतणार्‍या चाकरमान्यांची गर्दी होत आहे. सर्वच गाड्यांचे तिकिट आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. जनरल बोगीतही हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.

गावी येताना काही चाकरमान्यांचा प्रवास त्रासदायक होता. ज्यादा गाड्या सोडण्यात आल्याने मोठ्या संख्येने रेल्वे गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावत होत्या. परिणामी अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच कन्फर्म तिकिटे न मिळालेल्या चाकरमान्यांनी जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी एक एक दिवस अगोदर दादर, ठाणे आदी रेल्वेस्थानकांत रांगा लावल्या होत्या. त्यानंतर अनेक तासांचा प्रवास करून चाकरमानी गावी दाखल झाले होते. आता परत मुंबईला जातानाही तशीच गर्दी गाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

टप्प्याटप्प्याने चाकरमानी परतत आहेत. खासगी वाहने घेऊन आलेले चाकरमानीही परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्गावरही गाड्यांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. खासगी आराम बसेसचे बुकिंगही फुल्ल झाले असून तिकिटांचे दरही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून टप्प्याटप्प्याने चाकरमानी मुंबईला परतणार आहेत. तर पहिल्या पाच दिवसांत सुट्टी न मिळालेले चाकरमानी, अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अजूनही गावी दाखल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT