खासदार नारायण राणे File Photo
सिंधुदुर्ग

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिलपासून सुरू होणार

खा. नारायण राणे यांची माहिती; दर शुक्रवारी फेरी

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवा सुरू होणार आहे. एअर अलायन्सबरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवाही सिंधुदुर्गसाठी सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खा. नारायण राणे यांनी पत्रकाद्वारे दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल, असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून याच विमानतळावरून सिंधुदुर्ग-पुणे ही ‘प्लाय-91’ची विमान सेवा सुरू झाली आहे.

खा. नारायण राणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून नियमित सुरू असलेली मुंबई-सिंधुदुर्ग ही अलायन्स एअरलाईन्सची सेवा नियमित विमान सेवा बंद झाली होती. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे, यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या याकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा-सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यानुसार येत्या 18 एप्रिलपासून मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे. काही तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर त्याची माहिती जाहीर होईल, असे खा. नारायण राणे म्हणाले. पुणे - सिंधुदुर्ग - पुणे ही सेवा गेल्याच आठवड्यापासून सुरु झाली आहे.

यापूर्वी अलायन्स एअरने मुंबई- सिंधुदुर्ग-मुंबई मार्गावर उड्डाणे सुरू केली, त्याचा आरसीएस कालावधी 3 वर्षांचा होता, जो ऑक्टोबर-2024 मध्ये संपला. या आरसीएसचे नूतनीकरण न झाल्याने कंपनीने आपली उड्डाण सेवा थांबवली. मात्र याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. मुंबई -सिंधुदुर्ग विमानसेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. सणासुदीच्या काळात या हवाई प्रवासाचे तिकीट दर 25 हजार रू. पर्यंत वाढायचा. तरीही या माार्गवरील फ्लाईट नेहमीच बुक केल्या गेल्या. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी या मार्गाचा ‘आरसीएस’ आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी व सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आपण हवाई उड्डाण मंत्री नायडू यांच्याकडे केल्या असल्याचे खा. राणे यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT