नांदगाव : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कामाच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कासार्डे तिठा येथील ओव्हरब्रिजचा मधला स्लॅबचा काही भाग शनिवारी (दि.९) अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ आण्णा खाडये यांनी धोकादायक घटनेची कल्पना माजी आ. प्रमोद जठार यांच्या कानी घातली. तातडीने महामार्ग प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांशी माजी आ. जठार यांनी चर्चा केली. त्यानंतर तातडीने संबंधित अधिका-यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली.
शुक्रवारी जोरदार पाऊस सुरू असताना या उड्डाणपुलाखालीच्या स्लॅबचा खालचा थोडा भाग पडल्याचे निर्दशास आले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा या पुलाखालचा स्लॅबचा मोठा भाग कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्लॅब कोसळ्यानंतर उपसरपंच गणेश पाताडे, सहदेव खाड्ये यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बॅरिकेट लावून घेतले. त्यानंतर माजी आ. प्रमोद जठार यांच्याकडे या विषयाची माहिती दिल्यानंतर तातडीने या महामार्ग उड्डाणपुलाची डागडुजी करण्यात यावी , अशा सुचना त्यांनी केल्या आहेत. त्यानंतर संबंधित अधिका-यांनी झालेल्या घटनेबाबत येवून पाहणी केली.
या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतूक तिस-या लेनवरुन वळवली : देवीदास कुमावत
मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे उड्डाणपुल येथे स्लॅबच्या प्लास्टरचा भाग कोसळला असून त्यातील स्टिल बाहेर दिसत आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्याठिकाणी डागडुजी करण्यासाठी संबंधित टीम आली होती. वरील भागावरुन वाहतूक होवून आणखीन धोका होवू नये, म्हणून महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक तिस-या लेनवरुन वळवण्यात आली आहे. या भागाची लवकरात लवकर दुरुस्ती होईल , अशी माहिती महामार्ग प्राधिकरण कनिष्ठ अभियंता देवीदास कुमावत यांनी दिली आहे.
खारेपाटण उपविभागीय कार्यालय अभियंता नाही
मागील जूनमध्ये महामार्ग उपविभाग खारेपाटण कार्यालयातील अभियंता अतुल शिवनिवार याची नागपूर येथे बदली झाल्यानंतर हे पद वर्ष होत आले तरी रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खारेपाटण उपविभाग कार्यालयात लवकरच अभियंता मिळावा अशी मागणी होऊ लागली आहे.