discussing with Union Minister Nitin Gadkari, Mr. Narayan Rane
दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना खा. नारायण राणे. file photo
सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम गणेश चतुर्दशीपर्यंत पूर्ण करा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम गणेश चतुर्दशी उत्सवापर्यंत पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर सुशोभीकरण करावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खा. नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.

महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित असलेल्या कामासंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात यावेळी निर्णय झाला. गणेश चतुर्दशीपर्यंत हे काम पूर्णत्वास नेले जाईल अशा पद्धतीची यावेळी चर्चा करण्यात आली. नारायण राणे यांनी खासदार झाल्यानंतर महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्राधान्य देऊन पूर्णत्वास नेणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चौपदरीकरणाचे काम जलद गतीने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, नितीन गडकरी यांनी या प्रश्नावर जातीनेशी लक्ष घालून रत्नागिरीमधील अपूर्ण असलेले काम पूर्ण करू तसेच चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमाणात राहिलेले काम सुद्धा पूर्णत्वास नेले जाईल. पत्रादेवी ते राजापूरपर्यंत रस्ता दुतर्फा सुशोभीकरण कामही सुरू केले जाईल, अशी ग्वाही दिली. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास न्यावे यासाठी असणारा अडचणींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या सकारात्मक चर्चेतून चौपदरीकरणाचे काम यापुढे जलद गतीने सुरू होईल. प्रवाशांचे होणारे हाल संपतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

SCROLL FOR NEXT