सावंतवाडी ः मोती तलावात लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बोटिंग क्लब प्रकल्प उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर तरी सुरू करावा, अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केली. सध्या सगळीकडे उन्हाळी सुट्टी आहे. शाळांना सुट्ट्या पडल्याने अनेक पर्यटक सावंतवाडी शहरात दाखल होत आहेत. त्यामुळ पालिकेने मोती तलावातील बोटिंग क्लब तत्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून आणलेल्या बोटी गेले काही महिने कारंजाचे काम सुरू असल्याने बाजूला करून ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे गेले दोन ते तीन महिने त्या सडत आहेत. मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी याबाबत योग्य दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मोती तलावात जलविहार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बोटी खरेदी करण्यात आल्या. पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आणि कौतुकाचे पाऊल आहे. परंतु वस्तुस्थिती लक्षात घेता गेले दोन ते तीन महिने याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाखो रुपये किमतीच्या नव्या बोटी त्याठिकाणी सडत आहेत.
अनेक पर्यटक बोटी पाहून त्या ठिकाणी बोटींगचा आनंद घेण्यासाठी विचारणा करतात. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीच नसल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होतो. आता उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. अनेक पर्यटक सावंतवाडीत दाखल होत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प तत्काळ सुरू करण्याची गरज आहे.
यासाठी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हा रखडलेला प्रकल्प कार्यान्वित करावा. जेणेकरून मागच्यावेळी लाखो रुपये किमतीच्या बोटी सडून गेल्या तसा प्रकार पुन्हा निर्माण होणार नाही आणि नागरिकांचे पैसे पाण्यात जाणार नाहीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.