मान्सून तळकोकणात स्थिरावला  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Rain Updates : मान्सून तळकोकणात स्थिरावला

जिल्हाभरात पाऊस; शेतकरी सुखावला, पेरणीला वेग

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : केरळ, गोवा ते सिंधुदुर्ग असा सुसाट प्रवास करणारा मान्सून तळकोकणात दाखल झाल्‍यानंतर रखडला आहे. शनिवारी देवगडपर्यंत मजल मारलेल्‍या मान्सूनची गाडी त्‍याच ठिकाणी थांबली असल्‍याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मात्र, ईशान्य भारतात मान्सून एकसंध वेगाने पुढे सरकत आहे.

दरम्‍यान शनिवारी दुपारी सिंधुदुर्गात दाखल झालेल्‍या मान्सूनच्या सरी जिल्‍हाभरात कोसळत असून, भात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. तब्‍बल १५ दिवस श्रीलंकेत रखडलेला मान्सून ४ जून रोजी केरळम्‌मध्ये दाखल झाला. मान्सूनच्या सरासरी वेगानुसार तो ८ ते १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होण्याची अपेक्षा होती. मात्र, केरळात दाखल झाल्‍यानंतर मान्सूनच्या प्रवासाचा वेग विलक्षण गतीने वाढला केवळ २४ तासात म्‍हणजेच ५ जून रोजी तो गोव्यात दाखल झाला.

त्‍यानंतर अवघ्‍या १२ ते १४ तासांनी ६ जून रोजी दुपारी तो सिंधुदुर्गात दाखल झाला. याच वेगाने तो ८ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र व्यापेल अशी शक्‍यता होती. मात्र, सिंधुदुर्गात दाखल होताच मान्सूनला पुन्हा ब्रेक लागल्‍याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. रविवारी देवगडपर्यंत दाखल झालेला मान्सून रविवार ७ जून रोजीही तेथेच अडकला होता.

रविवारी रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मान्सूनपूर्व तुरळक पाऊस झाला. तर दुसरीकडे सिंधुदुर्गात मात्र धुवाँधार सरी बरसल्‍या. रविवारी मान्सून दाखल झाल्‍यापासून जिल्‍ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे भात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

त्‍याचबरोबर तापमानातही मोठी घट झाली असून, गरमीने हैरान नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाची संततधार अशीच कायम राहिल्‍यास येत्‍या दोन-चार दिवसांत जिल्‍ह्यातील नदी, नाले प्रवाहित होण्याची अपेक्षा आहे. यामुळे टंचाईग्रस्‍त वाडीवस्‍त्‍यांनाही दिलासा मिळणार असून, आंबोलीसह जिल्‍ह्यातील अन्य ठिकाणी वर्षापर्यटनास प्रारंभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT