ओरोस ः पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार करण्यासाठी शासन प्रत्येक जिल्ह्यात ‘मॉक ड्रिल’ करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार 7 मे रोजी ‘मॉक ड्रिल’ होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र, सागरी किनारपट्टी क्षेत्र अशी आठ ठिकाणी निश्चित करण्यात आली आहेत. याअंतर्गत मंगळवारी दु. 4 वा. ‘मॉक ड्रिल’ तर रात्री 8 वा. लाईट ड्रील होणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत ‘मॉक ड्रिल’ संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते. अति.पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीं उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी या चार नगरपरिषदा आणि देवगड सागरी किनारा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तिलारी धरण क्षेत्र या ठिकाणी हे मॉक ड्रील प्रामुख्याने होणार आहे. या बरोबर जिल्ह्यात सर्व गावांमध्ये अशा प्रकारचे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात अशी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहेत. यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आऊटसह विशेष प्रशिक्षण तसेच युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये याची माहिती देण्यात येणार आहे. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल, याचे प्रशिक्षण मॉक ड्रिलमध्ये देण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर देशभरातील 200 हून अधिक शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. या यादीत शहरांना तीन श्रेणीत विभागण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जनतेने दुपारी 4 ते 4 .15 या वेळेत होणार्या मॉक ड्रिल बरोबर जिल्ह्यातील अन्य शहरात आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये होणार्या प्रात्यक्षिकासाठी सतर्क रहावे, तसेच सायंकाळी 8 ते 8.15 वा. या वेळेत जिल्ह्याचा वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
या कालावधीत नागरिकांनी आपली वाहने जागेवर थांबवावीत, मोबाईल टॉर्च जमिनीवर ठेवावा अशा सूचना देण्यात आले आहे. यासाठी एनसीसी, एनएसएस, आरोग्य स्वयंसेवक यांना सतर्क ठेवण्यात आले असून वयोवृद्ध नागरिक, महिला यांच्यासाठी हे स्वयंसेवक काम पाहणार आहेत. तसेच आपत्कालीन मदतीसाठी पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथील आपत्ती कक्ष सतर्क राहणार आहेत. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून या प्रात्यक्षिकासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
ही एक खास अलार्म सिस्टम आहे, जी युद्धजन्य परिस्थितीत किंवा युद्ध, एअर स्ट्राईक वा कोणत्याही वेळी लोकांच्या सतर्कतेसाठी वापरली जाते. मुख्यतः लोकांना धोक्यापासून सावध करणे आणि शक्य तितक्या लवकर त्यांनी आपल्या सुरक्षित स्थानी पोहोचावे यासाठी हा सायरन वाजवला जातो.
प्रशासकीय भवन, पोलिस मुख्यालय, अग्निशमन केंद्र, सैन्यदल केंद्र, गर्दीच्या ठिकाणी, महत्त्वाच्या शहरी ठिकाणी
आश्रय स्थानातून बाहेर पडावे.
जखमींना मदत करावी. प्रथमोपचार करावे.
त्यांची वाहतूक करावी.
लहान-मोठ्या आगी लागल्या असल्यास अग्निशमन यंत्र किंवा आग विझवण्याच्या पद्धतीचा वापर करून त्या विझवण्यात याव्यात.
आलेल्या सेवांबरोबर समन्वय साधावे.
हवाई हल्ल्याची धोक्याची सूचना कमी जास्त आवाजात सायरनद्वारे मिळाल्यावर नागरिकांनी सतर्क व्हावे.
इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर असल्यास तळ मजल्यावर जावे.
घराच्या आतल्या भिंतीजवळ कोपर्यात बसावे.
मैदानात असल्यास जमिनीवर पोटावर झोपावे. दोन बोटे कानात, तोंडात रुमाल किंवा नरम वस्तू पकडून हाताचे कोपर जमिनीवर टेकवून छाती जमिनीपासून वर ठेवावी.
कार्यालय, शाळा, कॉलेज या ठिकाणी असल्यास टेबल खाली लपावे.
चारचाकी गाडी चालवत असल्यास गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून चावी गाडीलाच ठेवावी व वरील प्रमाणे आश्रय घ्यावा.
रेल्वेने प्रवास करत असल्यास बसल्या जागेवरच बसावे.
पाळीव प्राणी जनावरे बांधून ठेवावीत.
मोकळ्या मैदानात उभे राहू नये.
आग लागल्यास इमारतीवरून उड्या मारू नयेत.
प्रकाश बंदीच्या काळात विजेचा (बॅटरी) वापर करू नये.
घरात दरवाज्याजवळ किंवा खिडक्यांजवळ उभे राहू नये.
प्रकाश बंदीच्या काळात घरातील दिवे चालू ठेवून बाहेर पडू नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
पाळीव प्राणी व जनावरे यांना मोकळे सोडू नये.