बांदा : बांदा येथील आफताफ शेख (38) या तरुणाने राहत्या घरी पंख्याला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी बांदा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. दरम्यान मृत आफताफ याच्या मोबाईल त्याने केलेल्या व्हीडीओमुळे बांदा परिसरात खळबळ उडाली आहे. एका धार्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होणार्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे आफताफ याने म्हटले आहे. या नंतर नातेवाईकांनी संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5 वा. दरम्यान आफताफने आत्महत्येचा प्रयत्न केला. घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे दाखल केले. त्यावेळी तो जिवंत होता, मात्र शुद्धीवर नव्हता. वैद्यकीय अधिकारी डॉ. जनाबाई आव्हाड यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
काही तासांनी आफताफच्या मोबाईलमध्ये त्याचा भाऊ अब्दुल शेख याला एक व्हिडिओ सापडला. त्या व्हिडिओमध्ये आफताफने एका धार्मिक संघटनेतील पाच कार्यकर्त्यांची नावे घेत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, ‘मी जीवनाला कंटाळलो आहे. त्या धार्मिक संघटनेतील पाच तरुणांमुळे माझी आर्थिक स्थिती कोलमडली आहे. बायको-पोरांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही, त्यामुळे मी जीवन संपवत आहे.” या व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र आफताफच्या नातेवाईकांनी संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी नातेवाईकांना समज देत कायद्यानुसार आवश्यक तपास सुरू असल्याचे सांगितले. उशिरापर्यंत नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार कायम होता. या प्रकरणी आफताफचा भाऊ अब्दुल शेख यांनी बांदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “प्राथमिक चौकशीनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करून लवकरच कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती बांदाचे सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली. आफताफ शेख यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची मुलगी, तीन वर्षांचा मुलगा, भाऊ, वहिणी, तसेच आई-वडील असा परिवार आहे.