कुडाळ : शिवसेना ठाकरे गट व भारतीय जनता पक्ष यांच्यात तणाव निर्माण होईल, तसेच माजी केंद्रीय मंत्री व खा. नारायण राणे यांच्याविरोधात बदनामीकारक, प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांना कुडाळ दिवाणी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वा. या वेळेत शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे तत्कालीन आ. वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कथित चौकशीच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते.
त्यानंतर कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात आयोजित सभेमध्ये गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी खा. नारायण राणे यांच्याविषयी बदनामीकारक तसेच दोन पक्षांमध्ये दंगे घडवून आणण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्त्यव्ये केल्याची तक्रार तुकाराम साईल यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात केली होती.
या तक्रारीनुसार भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. खटल्या दरम्यान अनेक साक्षीदारांची बयानं नोंदवण्यात आली. आ. जाधव यांच्यावतीने अॅड. हितेश कुडाळकर व अॅड. केळकर यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करत दिवाणी न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी आ. जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.