बेपत्ता वृद्धाने मळगाव घाटीत गळफास घेऊन जीवन संपविले 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : बेपत्ता वृद्धाने मळगाव घाटीत गळफास घेऊन जीवन संपविले

सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-कुंभारवाडी येथील रहिवासी आणि 'नाना टेलर' म्हणून परिचित असलेले रामा लक्ष्मण शिरोडकर (६४) यांनी मळगाव घाटीलगतच्या जंगल परिसरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या शिरोडकर यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री उशिरा सापडला.

रामा शिरोडकर हे घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर संध्याकाळी नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची खबर दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. लोकेशन मळगाव घाटी परिसरात दाखवत असल्याने त्या दिशेने शोधमोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मळगाव घाटीलगत असलेल्या दाट जंगल परिसरात शिरोडकर यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पथकाला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मयत रामा शिरोडकर हे परिसरात 'नाना टेलर' या नावाने अत्यंत परिचित होते. त्यांच्या निधनामुळे मळगाव कुंभारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT