‘मटका’ लावणार्‍यांची कुटुंबे कर्जबाजारीच! (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Matka Gambling Impact | ‘मटका’ लावणार्‍यांची कुटुंबे कर्जबाजारीच!

व्यसनी अन् आळशी लोकांचा खेळ; केवळ बुकींचीच घरे भरतात

पुढारी वृत्तसेवा

गणेश जेठे

मटका जुगारावर अनेकांचे संसार चालतात असा जो निराधार दावा केला जातो तो पूर्णपणे झुठ आहे. मटका हा जुगार आहे, आणि जुगाराची अंतिम परिणीती ‘एक धनवान तर शंभर भिकारी’ अशीच आहे. यात फावते ते मटका घेणार्‍यांचे आणि बुकींचे. त्यातही त्यांना साथ देणार्‍या पोलिसांचीही तुमडी भरते. मटका लावणार्‍यांची कुटुंबे अखेरीस कर्जबाजारी बनतात, कंगाल होतात.

मटका लावण्याच्या तयारीत असणार्‍यांना सध्या पोलिस उचलत आहेत, हे चांगले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकीच्या अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर संपूर्ण सिंधुदुर्गात आणि महाराष्ट्रातही खळबळ उडाली. ही कारवाई करताना पोलिसांवर त्यांनी रोखठोक उघड आरोप केले. एका पोलिस अधिकार्‍यालाही निलंबित केले. त्यामुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पालकमंत्र्यांनीच धाड टाकल्यानंतर गेल्या पंधरा दिवसामध्ये हे धंदे बंद पडले आहेत. कुडाळ, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या ठिकाणचेही मटका बुकी थंडावले आहेत. काहींना सावंतवाडीत मटका घेणे शक्य नसल्यामुळे त्यांनी आपले बस्तान गोव्याकडे बसवल्याचीही चर्चा आहे. सध्या तरी मटक्याच्या चिठ्ठ्या आणि पेमेंट घेवून जाणारे मोटरसायकलस्वार लपून बसले आहेत.

निव्वळ मटक्यावर चालणारे स्टॉल बंद पडले आहेत. तरीही व्हॉटस्अ‍ॅपवर ऑनलाईन मटका घेतला जातो असे सांगण्यात येते. काहींचा दावा आहे की मटका बंद होणार नाही. परंतु यापुढे कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्गात मटका सुरू होवू देणार नाही असे पोलिसांनीच ठरवले आहे. पोलिसांनीच असा निर्णय घेतल्यामुळे यापुढे मटका माफियांना आपला काळा धंदा करता येणार नाही असे अपेक्षीत आहे.

एखाद्या बाजारपेठेत मटका घेणारे पाच सहाजण असतात. मात्र मटका लावणारे शेकडोंच्या संख्येने आहेत. मटका लावणार्‍यांच्या तुलनेत मटका घेणार्‍यांची संख्या खुपच नगण्य आहे. मटक्यामध्ये जी गुंतवणूक होते ती केवळ चार पाच तासांसाठी आहे. दुपारी लावलेल्या मटक्याचा निकाल पुढच्या चार पाच तासात लागतो. म्हणजेच त्याची परतफेड पाच सहा तासात करावी लागते. त्यामुळे बुकीकडे साठलेल्या रक्कमेमध्ये कोणत्याही मार्गाने वाढ होत नाही. उलट जमलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम बुकी आपल्यासाठी कमीशन म्हणून ठेवतात. शिल्लक राहिलेल्या रक्कमेपैकी काही रक्कमच फक्त शेकडो पैकी एक दोन लोकांना मिळते. इतर रक्कम ही मुख्य बुकीकडेच जाते. टपरी चालवणारे जे मटका घेतात ते कमी रक्कम असेल तर बुकीकडे न पाठविता आपल्याकडेच ठेवतात आणि पैसा कमवतात. एखाद्या मटका लावणार्‍या व्यक्तीने एका वर्षाचा हिशोब केला तर त्याने लावलेल्या रक्कमेपेक्षा त्याला मिळालेली एकूण रक्कम कमीच असणार.

मटका लावणे हे व्यसन आहे. सुरूवातीला अनेकजण पैसा कमवण्यासाठी मटका लावतात मग मात्र त्यांना त्याची सवय लागते. कधीतरी काही पैसे लागलेच तर हे व्यसन आणखी वाढते. अगदी गावातले लोकसुध्दा पाच सहा कि.मी. चालत मिळेल त्या वाहनाने बाजारपेठ गाठतात आणि मटका लावतात. पैसे संपले की कुणाकडूनतरी उसणे घेतात. तेही संपले की मग कुटुंबियांच्या मागे लागतात. कुटुंबियांनी कमवलेल्या पैशात मग मटका खेळणे सुरू होते. यातुनच अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात.

मटका हा जुगारच आहे. यामध्ये मटका घेणारे आणि बुकी यांचेच फक्त संसार चालतात. शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करून स्वत:चा संसार फुलवू पाहणार्‍या या मटका माफियांना कशाचीही फिकीर नसते. त्यात काही पोलिस आपले हात ओले करून घेतात, असे आरोप आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे पिढ्यान्पिढ्यांमधील अनेक तरूणांना वाया घालवणारा हा काळा धंदा उघडपणे सुरू होता. पालकमंत्र्यांनीच या माफियांना फटका दिल्यामुळे आता हे मटका कींग थोडे थंडावले आहेत, परंतु ते यापुढेही ते डोके वर काढू नयेत यासाठी पोलिस यंत्रणेने सतर्क रहावे असे सर्वसामान्य जनतेला वाटते आहे.

‘तोंडात गुटखा आणि टपरीवर मटका’

‘तोंडात गुटखा आणि टपरीवर मटका’ हे जणू समीकरणच झाले आहे. मटका लावणार्‍यांचा मुळात मेहनतीवर विश्वास नाही. कष्ट न करता पैसा कमवण्याची मनोवृत्ती अशा लोकांची असते. मटका लावणारे बहुतांश लोक आळशी आणि व्यसनी आहेत. कोणताही कामधंदा न करता दिवसभर एखाद्या गणितज्ज्ञाच्या अर्विभावात या लोकांचा दिवसभराचा व्यवहार असतो. रात्री 12.30 वाजेपर्यंत आकडा काय येईल यासाठी हे लोक जागे असतात. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात मटका बंद असल्यामुळे या दिवसांमध्ये अलिकडे बाजारपेठांमध्ये गर्दी कमी असल्याचे दिसून येते. कुटुंबाच्या पालनपोषणाकडे आणि मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून मटका खेळण्याचा आनंद हेच त्यांचे जीवन बनून जाते. यातुनच अनेक कुटुंबे कंगाल झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT