वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील रायसाहेब डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ ही शाळा शासन निर्णयानुसार शून्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मंगळवारी कृती समिती, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने हायस्कूल समोर स. 10.45 ते सायं. 5.45 वा. या वेळेत विद्यार्थ्यांसह ‘हायस्कूल बचाव-शाळा बंद आंदोलन’ करण्यात आले. दरम्यान, शिक्षण विभाग माध्यमिक कनिष्ठ प्रशासन अधिकारी गोविंद घोगळे यांनी याबाबत लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन सायंकाळी मागे घेण्यात आले.
ग्रामस्थ व पालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपा जिल्हा पदाधिकारी रवींद्र सिरसाट यांनी याबाबत यशस्वी शिष्टाई केली. आंदोलन सुरू होऊन 5 तास उलटले तरी शिक्षण विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर सायं. 4 वा. माध्यमिक विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी गोविंद घोगळे आंदोलन स्थळी दाखल झाले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मागण्यांसंदर्भात श्री. घोगळे यांच्याकडून आश्वासक आश्वासन मिळत नसल्याने कृती समिती पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ महिलांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना धारेवर धरले.
त्यानंतर रवींद्र सिरसाट, कृती समिती सल्लागार रवींद्र खानोलकर यांनी श्री. घोगळे यांच्याशी दीड तास चर्चा करून तोडगा काढला. त्यानंतर गोविंद घोगळे यांनी कमिटीच्या प्राप्त निवेदनानुसार रायसाहेब डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल ही शाळा सन 2024 -2025 च्या पटसंख्येनुसार शून्य शिक्षकी झाली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे निवेदन प्राप्त आहे. सदर निवेदन पालकमंत्री नितेश राणे व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन सचिव व शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
त्याची प्रत बुधवार, 10 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत मठ हायस्कूल कृती समितीला देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर पालकांनी संयमाची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले. श्री. घोगळे यांनी लेखी आश्वासन कृती समिती अध्यक्ष दिगंबर परब व पालक यांच्याकडे सुपूर्द केले. डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कुल मठ कृती समिती, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी यांच्या वतीने हे ‘हायस्कूल बचाव आंदोलन’ शांततेत छेडण्यात आले. सर्वप्रथम छ. शिवाजी महाराज पुतळ्यास, डॉ. रा. धों. खानोलकर यांच्या प्रतिमेस व सरपंच रुपाली नाईक यांच्या हस्ते दीपप्रजवलन करून व राष्ट्रगीताने सकाळी 10.45 वा. आंदोलनास सुरुवात झाली.
मठ सरपंच रुपाली नाईक, कृती समिती सल्लागार रवींद्र खानोलकर, कृती समिती अध्यक्ष दिगंबर परब, उपाध्यक्ष केशव ठाकूर, सचिव संतोष तेंडोलकर, नूतन हितवर्धक मंडळ मुंबईचे सदस्य प्रकाश मठकर, भाजपाचे जिल्हा पदाधिकारी रवींद्र सिरसाट, कमिटी सदस्य तुषार आईर, न्हानू गावडे, शैलेश राणे, कृष्णा मठकर, प्रीती परब, मयुरी ठाकूर, सुनिखी धुरी, ग्रा. पं. सदस्य शमिका मठकर, संतोष वायंगणकर, महेश सावंत, कृष्णा मठकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलम गावडे, उपाध्यक्ष संजना तेंडोलकर, मठ पोलिसपाटील अदिती परुळेकर, सतये पोलिसपाटील शमिका धुरी, माजी सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकूर, माजी सरपंच किशोर पोतदार, माजी उपसरपंच नीलेश नाईक, पत्रकार व माजी विद्यार्थी अजय गडेकर आदी शिक्षणप्रेमी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शिंपी या उपस्थित राहेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. तसेच रवी खानोलकर यांनी शाळेच्या बचावासाठी प्रसंगी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या शाळा बंद आंदोलनास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर, वृंदा गवंडळकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख श्री. आव्हाड, वेतोरे श्री देवी सातेरी सोसायटी माजी चेअरमन विजय माईक, दाभोली हायस्कुल मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, सुरेश बोवलेकर आदीनी भेट दिली.
आंदोलन अन्य शिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शक
शासनाने हे धोरण अन्यायकारक आहे. त्यास तात्पुरती स्थगिती दिली असून येत्या वर्षात याबाबत शाळेचे नुकसान होऊ नये यासाठी कालावधी वाढविला आहे. परंतु पटसंख्येची टांगती तलवार कायम आहे. याबाबत मठ हायस्कूल कृती समिती, माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी यांनी छेडलेल्या ‘हायस्कुल बचाव’ आंदोलनामुळे शासनास निश्चित जाग येईल, असे मत उपस्थित शिक्षणप्रेमींनी व्यक्त केले. मठ ग्रामस्थांनी हायस्कूल वाचवण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील अन्य शिक्षणसंस्था व विद्यालयांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल,असे मत उपस्थित शिक्षणप्रेमी व महिलांनी व्यक्त केले.