मसुरे-देऊळवाडा ग्रामस्थांचे ‘ढोलताशा’ आंदोलन 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : मसुरे-देऊळवाडा ग्रामस्थांचे ‘ढोलताशा’ आंदोलन

ग्रा. पं. ग्रामनिधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मालवण ः मसुरे-देऊळवाडा ग्रामपंचायतीने इमारतीसाठी खरेदी केलेल्या जागेमध्ये ग्रामनिधीचा गैरवापर केला, असा आरोप करत त्याची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी काही ग्रामस्थांनी मालवण पंचायत समितीसमोर ढोलताशा आंदोलन केले. पंचायत समिती आवारात केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ आमने- सामने आले होते. अखेर गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव घेऊनच जागा खरेदी केली आहे. तसेच आठ दिवसात सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात येईल, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

मालवण-देऊळवाडा ग्रामपंचायतीने नवीन इमारत बांधकामसाठीग्रामनिधीतून गैरव्यवहार केला असून सर्व्हे नंबर 133 हिस्सा नंबर 29 ही जमीन खरेदी खताने खरेदी केली आहे. त्यासाठी ग्रामनिधी फंडाचा गैरवापर केला असून त्यात गैरव्यवहार झाला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे, असा आरोप करत सोमवारी काही ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर आणि ग्रामस्थ मंगेश तांबे यांच्या नेतृत्वाखालीमालवण पंचायत समिती समोर ढोल-ताशा आंदोलन केले. आंदोलकांनी पंचायत समिती आवारात घुसण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने आंदोलकांना रोखले. ढोल-ताशा वाजविणे किंवा आंदोलनाची कोणती परवनागी घेतली? असा सवाल अधिकार्‍यांनी केला. त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या जागेमध्ये गैरव्यवहार झाला आहे, त्यासाठी कोणतीही ग्रामसभा घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाल्याने आधिकारी आणि ग्रामस्थ आमने सामने आले. नवीन इमारत बांधकामास स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव घेऊन इमारतीसाठी देऊळवाडा-मसुरे रस्त्यालगत 1 लाख 60 हजार रू. या नाममात्र दारात 5 गुंठे जागा खरेदी केली. ग्रामपंचायतीला जमीन खरेदीचा अधिकार आहे. मासिक सभा घेऊन जागा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते. जागा खरेदी झाल्यानतर आता मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत इमारतीसाठी निधी मंजूर आहे, अशी माहिती गटविकास आधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT