मालवण : वायरी लुडबेवाडा येथे रात्रीच्या सुमारास एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किट असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घरातील सर्व व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग लागलेले घर भगवान अनंत लुडबे यांचे असून आई उमा लुडबे, बहीण आरती रवींद्र गावकर या त्या ठिकाणी राहात होत्या.
आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी मालवण नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्या सह अग्निशमन विभागाचे वैभव वळंजू, सुमित हसोलकर, बाळकृष्ण जाधव, विरेश वळंजू, नितीन शिरसेकर बंबासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन पथकाने तातडीने आग विझविण्याचे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनीही अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठी मदत केली. नागरिक आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
नागरिक व नगरपरिषद अग्निशमन यंत्रणेच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात
आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घरातील व्यक्तींना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने परिसरातील इतर घरांनाही धोका निर्माण झाला नाही. अग्निशमन विभागाची तत्परता आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.