कोल्हापूर : एखादा दर्जेदार पुतळा घडविण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अत्यावश्यक असतो. इतकेच नव्हे, तर तो तयार करण्यासाठी अनेक स्तरांतून त्याचा प्रवास होतो. यासाठी किमान ५ ते ६ लोकांची टीम अखंड सक्रिय असते. यात आर्टिस्ट, मोल्डर, कास्टिंग फोरमन, कास्टर आणि सहायक आदी लोकांचा समावेश असल्याची माहिती अनुभवी मूर्तिकारांनी दिली.
मालवण येथील पुतळा घाईगडबडीने अल्पावधीत घडविल्याने त्यात अनेक त्रुटी राहिल्याने तो पडल्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला.
• लोकांची गरज, आवड, निवड, विषय यानुसार शिल्पकार मूर्तीचे स्केच तयार करतो.
• स्केच मंजूर झाल्यावर त्याचे स्केल मॉडेल तयार केले जाते.
• या स्केल मॉडेलचे क्ले (माती) मॉडेल तयार केले जाते. यात अॅनाटॉमी, फिगर या बारकाव्यांचा समावेश असतो.
• तयार झालेल्या क्ले मॉडेलला मंजुरी देण्याचे काम कला संचलनालयाच्या समितीकडून केले जाते.
• समितीकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार वेस्ट मॉडेल आणि त्या आधारे फायबरचा पुतळा घडविला जातो.
• पीस मोल्डिंगनंतर मेणाची कॉपी तयार केली जाते. त्यावर प्लॅस्टर, वाळू मिश्रणाचा गोळा तयार केला जातो. •
गोळ्यात ब्राँझचा रस ओतला जातो. तयार झालेल्या शिल्पाला आवश्यकतेनुसार
आर्मेचर स्टील, बेस आदी गोष्टींची जोड दिली जाते.
• तयार झालेल्या मूर्तीचे फिनिशिंग व सुशोभीकरणानंतर पुतळा पूर्ण होतो.
दीड-दोन फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्याचा अनुभव असलेल्या आणि शिल्पकलेतील पहिल्या अक्षराचीही ओळख नसणाऱ्या नवख्या मूर्तिकाराला भव्य शिल्पनिर्मितीचे काम देण्यात आले आहे. कमाईसाठी वैयक्तिक 'अर्थ' पूर्ण संबंधांतून केवळ कलाक्षेत्रातील पदवीधर म्हणून इतके मोठे काम दिल्यामुळे हा प्रकार घडला आहे. संबंधित मूर्तिकाराला मूर्तीनिर्मितीतील कोणतीही प्रोसेस माहिती नसल्याचे दिसते. क्ले मॉडेल, प्लॅस्टर मॉडेल, फायबर मॉडेल, पिस फोल्ड अशा गोष्टींपासून हा मूर्तिकार कोसो दूर असल्याचे दिसते.- डॉ. राजू राऊत, शिल्पकार, शिवशाहीर
मजबूत व दीर्घकाळ टिकणारी मूर्ती घडविण्यासाठी तिला विविध स्तरांतून जावे लागते. बरकाईने अभ्यास व निरीक्षणातून त्यातील त्रुटी दूर होतात. ८५ टक्के तांबे, ५ टक्के सिलिकॉन, ५ टक्के शिसे, ५ टक्के निकेल या गोष्टींच्या मिश्रणाचा वापर करावा लागतो. अशा मिश्र धातूंमुळे बनलेल्या पुतळ्यावर कशाचाही परिणाम होत नाही. तो दीर्घकाळ टिकतो.- ओंकार कोळेकर, मूर्तिकार