ओरोस : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकर्यांबाबत असंसदीय भाषा वापरतात, विधानसभेत रमीचा खेळ खेळतात, शासन भिकारी असल्याचे सांगतात, अशी व्यक्ती मंत्री म्हणून राहण्यास पात्र नाही. तरी कोकाटे यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी गुरुवारी जिल्ह्यातील शरद पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे सादर केले.
पुंडलिक दळवी, सा. बा. पाटकर, उत्तम सराफदार, सचिन पाटकर, जयेश धुमाळे, तेजस्विनी कदम, दीपिका राणे, ममता नाईक, सच्चिदानंद कनयाळकर, चंद्रकांत नाईक, अल्मेश शहा, गौतम महाले, उल्हास नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकर्यांबद्दल असंसदीय भाषा वापर करणे, पंचनाम्यासाठी अरेरावीची भाषा करणे, अधिवेशन सुरू असताना चक्क सभागृहात मोबाईलवर रमी खेळणे, वारंवार बेजबाबदार वक्तव्ये करणे, यामुळे शेतकरीव महाराष्ट्राची बदनामी होत आहे. कोकाटे यांच्या या अशोभनीय कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. अशी बेजबाबदार व अहंकारी व्यक्ती राज्याच्या मंत्रिपदावर राहण्यास पात्र नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
कोकाटे यांच्या वर्तणुकीचा निषेध म्हणून आम्ही त्यांना ‘पत्त्यांचा बॉक्स’ टपालाद्वारे पाठवत आहोत. याबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.