मालवणात रंगणार युवा साहित्याचा जागर! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : मालवणात रंगणार युवा साहित्याचा जागर!

२८ व २९ नोव्हेंबर रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला नव्या पिढीच्या विचारांची, सर्जनशीलतेची आणि अभिव्यक्तीची जोड देणारा साहित्यिक सोहळा मालवणनगरीत रंगणार आहे. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानित सहकार्याने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने शनिवार २८ व रविवार २९ नोव्हेंबर रोजी ‘सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझा काळ, माझी भूमिका’ हे संमेलनाचे मध्यवर्ती आशयसूत्र असून, बदलत्या काळातील तरुणाईचे विचारविश्व, सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न, साहित्याची बदलती रूपे आणि नव्या पिढीच्या अभिव्यक्तीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर,अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. ज्योती तोरसकर, ॲड. प्रमोद देसाई, ॲड. संदीप निंबाळकर, शैलेश खांडाळेकर, सिद्धेश सावंत, डॉ. सुमेधा नाईक, संजय आचरेकर आदी उपस्थित होते. प्रा. बांदेकर म्हणाले, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘महात्मा जोतिबा फुले साहित्यनगरी’मध्ये हे दोन दिवसीय संमेलन होणार आहे. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रीरंजन आवटे संमेलनाध्यक्षपद भूषविणार असून, कोल्हापूर येथील प्रसिद्ध कलावंत ऋचिका खोत यांच्या हस्ते रविवार २९ नोव्हेंबर रोजी स. १० वा.संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. देवदत्त परुळेकर सांभाळणार आहेत.

साहित्य दिंडीतून मालवणनगरीत घुमणार साहित्याचा जागर!

संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवार २ रोजी स. ९.३० वा. मालवण शहरातून साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ होईल. शिवाजी वाचन मंदिर, भरड, बाजारपेठ, नगर वाचन मंदिर आणि टोपीवाला हायस्कूल मार्गे ही दिंडी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे पोहोचेल. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, साहित्यप्रेमी, लोककलावंत तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी या दिंडीत सहभागी होणार आहेत. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही दिंडी संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे.

‘जेन झी’च्या भाषेवर रंगणार वादसंवाद

­आजच्या तरुणाईची बदलती भाषा, संवादशैली आणि डिजिटल युगातील अभिव्यक्ती यांचा वेध घेणारा ‘जेन झी ची भाषा : नवा आविष्कार की घसरण?’ हा वादसंवाद संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये ॲड. सहिष्णू पंडित, दर्श सामंत आणि ॲड. सृजन वाटवे सहभागी होणार आहेत. नव्या पिढीची भाषा ही सर्जनशीलतेची नवी दिशा आहे की भाषिक मूल्यांपुढील आव्हान, यावर विविध दृष्टिकोनांतून चर्चा होणार आहे. यानंतर स्नेहा कदम यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे युवा कविसंमेल होणार आहे. सायंकाळी या साहित्य सोहळ्याची सांगता होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT