मालवण : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात मंगळवार २६ मेपासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्टस् पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी काढलेल्या अधिकृत पत्रानुसार, २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा, नौकाविहार आणि स्कूबा डायव्हिंग बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
'इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७' अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षिततेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग व वॉटर स्पोर्टस् संघटना, तसेच स्थानिक स्कूबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे.