अरुंद रस्ते व पार्किंगची पुरेशी सोय नसल्याने पर्यटकांच्या वाहनांमुळे मालवणातील वाहतूक व्यवस्था अशी विस्कळीत झाली आहे. pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ऐन पर्यटन हंगामात मालवण शहरातील वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर

Sindhudurg traffic: प्रशासन व पोलिसांकडून नियोजनाचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

Malvan tourism season problems

मालवण : मालवण शहरात सध्या पर्यटकांची गर्दी असून मोठ्या संख्येने पर्यटकांची वाहने शहरात दाखल झाली आहेत. आधीच अरुंद रस्ते व पार्किंगची पुरेशी सोय नसल्याने पर्यटकांच्या वाहनांमुळे मालवणातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार होत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने त्याचा फटका पर्यटक व स्थानिक नागरिकांना बसत आहे.

पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणासाठी कोणीही सक्षम पोलीस कर्मचारी अथवा वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेला नसून केवळ नवख्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या जीवावर वाहतुकीचा ताण रेटला जात असल्याचे चित्र मालवणात दिसत आहे.

मालवण शहरात दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक दाखल होतात. यंदाच्या पर्यटन हंगामातही मालवणात बहुसंख्य पर्यटकांनी भेट दिली असून सध्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरु असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी शहरात झाली आहे. मालवण शहरातील अरुंद रस्ते हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला असून पर्यटकांमुळे वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे.

देऊळवाडा ते भरड नाका, भरड नाका ते बाजारपेठ मार्गे बंदर जेटी, मेढा राजकोट रस्ता या रस्त्यांवर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होत आहे. असे असताना भरड नाका, देऊळवाडा नाका, बाजारपेठ सकपाळ नाका, फोवकांडा पिंपळ, बंदर जेटी रस्ता या महत्वाच्या आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी एकही सक्षम पोलीस कर्मचारी दिसून येत नाही. भरड नाक्यावर कधीतरी वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून येतात. शहरात काही ठिकाणी केवळ नवखे होमगार्ड्स कर्मचारी दिसून येत आहेत.

बंदर जेटी परिसरातील पार्किंग व्यवस्था सोडल्यास मालवण शहरात कुठेही पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. वाहतूक कोंडी तसेच रस्त्यालगत गाडी पार्किंग वरून पर्यटक व स्थानिक नागरिक यांच्यात खटकेही उडत आहेत. अशावेळी सक्षम पोलीस कर्मचारी तैनात असणे आवश्यक असताना त्याकडे पोलीस यंत्रणेने पुरेसे लक्ष दिलेले नाही. अनेक ठिकाणी नागरिक व पर्यटकांनाच वाहतुक नियंत्रित करावी लागत आहे.

मालवणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता किमान पर्यटन हंगामात तरी वाहतूक व्यवस्था होमगार्ड्स भरोसे सोडली जाऊ नये, पोलीस कर्मचारी अथवा वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जिल्हा वाहतूक पोलीस सीमेबाहेर बंदोबस्तात व्यस्त

मालवण शहरात ऐन पर्यटक हंगामात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. काही जिल्हा वाहतूक पोलिसांची शहर पॉईंट वर नेमणूक केली असताना ते पोलीस शहराच्या सीमेबाहेर आपली सेवा बजावून परस्पर निघून जात असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मालवण शहरात ऐन पर्यटक हंगामात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. काही जिल्हा वाहतूक पोलिसांची शहर पॉईंट वर नेमणूक केली असताना ते पोलीस शहराच्या सीमेबाहेर आपली सेवा बजावून परस्पर निघून जात असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT