मालवण तालुका दुष्काळाच्या छायेत 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News|मालवण तालुका दुष्काळाच्या छायेत

भाजप पदाधिकाऱ्यांनी बांधावर जात घेतला परिस्थितीचा आढावा; शेतकरी, जलसाठे व पिकांची प्रत्यक्ष पाहणी

पुढारी वृत्तसेवा

मालवण : पावसाने ओढ दिल्याने मालवण तालुक्यातील शेती आणि पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन भातशेती, अन्य पिके तसेच जलसाठ्यांची पाहणी केली. शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या असून, या पाहणीचा सविस्तर अहवाल पालकमंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण तालुका पिंजून काढला. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्यात आल्या. देवबाग मतदारसंघातील देवली, मसुरे मतदारसंघातील हडी, आचरा मतदारसंघातील हिर्लेवाडी, आडवली मतदारसंघातील हिवाळे, सुकळवाड मतदारसंघातील नांदोस आणि पेंडूर मतदारसंघातील वराड येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. शेतामध्ये जाऊन भातपीक व अन्य पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच उपलब्ध जलसाठ्यांचीही पाहणी करण्यात आली. काही भागांमध्ये भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलस्रोतांच्या ठिकाणी बंधारे उभारण्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

या पाहणीदरम्यान भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर, पंचायत समितीचे उपसभापती शाम झाड, पं. स.सदस्य दीपक सुर्वे, सीमा परुळेकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण, देवली सरपंच शाम वाक्कर, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, वायंगणी उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर, अरुण परब, पूजा वेरलकर, शिल्पा खोत आदी उपस्थित होते.

१९७२ नंतरची गंभीर परिस्थिती

पाहणीनंतर बोलताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, “१९७२ नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ सध्या जिल्ह्यात जाणवत आहे. शेती हिरवी दिसत असली तरी जमिनीत पाणी नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आता पाऊस पडला तरीही शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती आहे. पाऊस कमी झाल्याने अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.”

गावागावांतील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या असून, या पाहणीचा अहवाल पालकमंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात येणार आहे. तसेच पाणी अडविण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले.

पंचनाम्यांसाठी कार्यकर्तेही मैदानात

वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाबरोबरच भाजप पदाधिकारी व कार्यकर्तेही विविध ठिकाणी पाहणी करून पंचनामे करत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच लक्ष घातले असून, त्यांच्या सूचनेनुसार प्रशासन दुष्काळ निवारणासाठी कार्यरत असल्याचे चिंदरकर म्हणाले. खा. नारायण राणे यांनीही जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेशी चर्चा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या परिस्थितीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे चिंदरकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT