सिंधुदुर्ग

मालवण : माकडाचा झडपेमुळे खैदा येथे रिक्षा पलटी, चालक ठार

backup backup

मालवण; पुढारी वृत्तसेवा : मालवणहुन खैदाच्या दिशेने जाणारी रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. माकडाने रिक्षाकडे धाव घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. आज (दि. ११) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आडारी- खैदा रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक जयराम उर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अपघाताची गौरव कांबळी (रा. खैदा) यांनी मालवण पोलीस स्थानकात माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. ११) सकाळी साडे अकराच्या सुमारास जयराम मसुरकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एम. एच. ०७ ए.एच. १८६०) घेऊन मालवणहुन आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. या मार्गावरील बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एका माकडाने मसूरकर यांच्या रिक्षाच्या आतमध्ये उडी घेतली. यामुळे घाबरलेल्या मसूरकर यांचा रिक्षावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात मसुरकर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यात गंभीर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी त्याच रस्त्यावरून मोटारसायकलने जाणाऱ्या गौरव कांबळी यांनी हा अपघात होताना पाहून पलटी झालेल्या रिक्षेकडे धाव घेतली. यावेळी त्यांना मसुरकर हे निपचित पडलेले दिसून आले. कांबळी यांनी मसूरकर यांचे मेहुणे उमेश मांजरेकर यांना या अपघाताची माहिती दिली. यानंतर बाबा मांजरेकर यांच्या रुग्णवाहिकेतून मसूरकर यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजूर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

जयराम मसुरकर यांच्या अपघाताचे वृत्त समजताच मालवणातील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत हळहळ व्यक्त केली. जयराम मसुरकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.दुपारी भरड येथील समित्र रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा व्यवसाय बंद ठेवला होता.

SCROLL FOR NEXT