मालवण : शहरामध्ये भरड परिसरात बुधवारी पहाटे ५ वा.च्या सुमारास दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना या मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबवली. या शोध मोहिमेला यश आले असून या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना हा मुलगा घराबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान या बालकाला भटक्या कुत्र्यांनी घेरले होते, मात्र स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे तो कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचला. या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात खळबळ उडाली होती. भरड परिसरात पहाटे अनोळखी मुलगा फिरत असल्याचे समजताच पत्रकार मनोज चव्हाण यांनी तत्काळ याची माहिती व्हाॅट्सअप वरून त्या मुलाच्या छायाचित्रासह प्रसारित केली. हा मेसेज काही मिनिटातच शहरासह तालुक्यात जोरदार व्हायरल होऊन त्या मुलाच्या शोधमोहिमेत महत्त्वाचा ठरला.
दरम्यान मालवण पोलिसांनी घटनास्थळी जात बालकाला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले. मात्र हा मुलगा कुणाचा आहे आणि तो भरड परिसरात कसा पोहोचला? याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात होती. या बालकाबाबत किंवा त्याच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन लिसांनी केले होते. त्यानुसार नागरिकही या मुलाच्या पालकांचा शोध घेत असताना हा मुलगा एसटी स्टॅण्डच्या पाठीमागे राहणाऱ्या परप्रांतीय कामगार कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. रात्री दरवाजा उघडा असताना पहाटे मुलगा बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. अखेर मुलाच्या पालकांबाबत खात्री पटताच मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले.