मालवण : बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रिक्षा टेम्पोसह सुमारे 500 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून मालवण नगरपरिषद येथे आणण्यात आल्या. रविवारी मालवण मच्छिमार्केट मासे लिलाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
मालवण मच्छिमार्केट मासे लिलाव परिसरात बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्या होलसेल स्वरूपात विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वच्छता निरीक्षक संजय पवार, आरोग्य लिपिक मंदार केळूसकर, कर्मचारी सागर जाधव त्याठिकाणी पोहचले. पांढऱ्या रंगाच्या रिक्षा टेम्पोमध्ये प्लासिक पिशव्यांचा साठा असल्याची खात्री झाली. कट्टा येथून हा प्लास्टिक पिशवी साठा आणल्याची माहिती मिळाली.
कारवाई पथकाने रिक्षा टेम्पो व प्लास्टिक पिशवी साठा ताब्यात घेऊन नगरपरिषद येथे जमा केला आहे. प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर पाच हजार दंडात्मक कारवाई होणार आहे. तर पुन्हा आढळ्यास नियमानुसार पुढील मोठी कारवाई केली जाईल, असे स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले. बंदी असलेले प्लास्टिक हे पर्यावरणासाठी हानिकारक आहे, ते विघटनशील नसल्यामुळे शेकडो वर्षे पर्यावरणात राहते. यामुळे प्रदूषण वाढते, ड्रेनेज सिस्टममध्ये अडथळे येतात. याचा जनावरे आणि मानवी आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. तरी बंदी असलेल्या प्लास्टिक व पिशव्यांचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वर कारवाई मोहीम सुरु राहणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वच्छता विभागाच्या कारवाईचे कौतुक केले आहे. मालवण शहराच्या व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व शहर विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्टीत आम्ही सोबत आहोत, असे दीपक पाटकर यांनी सांगितले.