smart meter Pudhari
सिंधुदुर्ग

Smart Electricity Meter Issues | कल्पना न देता स्मार्ट मीटर लावले तर गाठ आमच्याशी! मालवणच्या ऊर्जा मित्र बैठकीत वीज कंपनीला सज्जड दम

Smart Electricity Meter Issues | मालवणातील ऊर्जा मित्र बैठकीत ग्राहकांनी वाचला वीज समस्यांचा पाढा

पुढारी वृत्तसेवा

मालवण : उदय बापर्डेकर

मालवण येथील बीज वितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या ऊर्जा मित्र बैठकीत वीज ग्राहकांनी वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या उद्धट वर्तवणुकीचा पाढा वाचतानाच कोणतीही कल्पना न देता बसविले जाणारे डिजिटल स्मार्ट वीज मीटर व या मीटरमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडत वीज कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

यावेळी वीज अभियंता सचिन म्हेत्रे यांनी या समस्या मान्य करत वीज अधिकाऱ्यांना ग्राहकांशी सौजन्याने व समन्वयपूर्वक वागण्याच्या सूचना देतानाच स्मार्ट वीज मीटर बसविण्याबाबत लवकर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या ऊर्जा मित्र बैठकीस ग्राहक पंचायतीचे मालवण शाखा संघटक नितीन वाळके, श्रीकांत वेंगुर्लेकर, महेश काळसेकर, सुदेश चव्हाण, प्रमोद मोहिते, वफा खान, प्रताप बागवे, नीलकंठ मालवणकर, संतोष मुणगेकर, रघुनाथ मोडकर, सदाशिव आरोसकर, एम. व्ही. गवडे, ए. इ. गवंडे, अरविंद मॉडकर, स्नेहा मेथर, सिद्धेश मलये,

हेमंत कोचरेकर, शिशुपाल राणे, रत्नाकर कोळंबकर, उदय मोंडकर, आप्पा मालंडकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्राहकांनी वीज विषयक विविध समस्या मांडल्या. वीज समस्या तक्रारीसाठी वीज कार्यालयातील फोनवर संपर्क केला असता फोन उचलला जात नाही अशी तक्रार यावेळी मांडण्यात आल्यावर फोन घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सांगितले. तसेच मेढा येथील शंकर मंदिर परिसरात लवकरात लवकर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी करण्यात आली. तर तळगाव येथील शिशुपाल राणे यांनी वाढीव वीज बिलाबाबत तक्रार मांडली.

वीज अधिकाऱ्यांकडून उद्धट वागणूक

एका वीज अधिकाऱ्यास ग्राहकांनी वीज समस्या निवारणासाठी फोन केला असता अधिकाऱ्याकडून उद्धट शब्दात उत्तरे व सूचना दिली जात असल्याची तक्रार यावेळी वीज ग्राहकांनी मांडली. संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तनाबाबत मालवण मधून अनेक ग्राहकांच्या तक्रारी असल्याचे यावेळी नितीन बाळके यांनी सांगितले.

यावर अभियंता श्री. म्हेत्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यास बोलावून घेत ग्राहकांशी सौजन्याने व समन्वयपूर्वक वागण्याची सूचना देत संबंधित ग्राहकांच्या तक्रारीबाबत थेट प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून वीज समस्या सोडवाव्यात असे त्या अधिकाऱ्यास सांगितले. तसेच विविध ठिकाणच्या वीज समस्यांबाबत सर्व्हे करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे यावेळी श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.

स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकास फटका

मालवण धुरीवाडा येथील स्नेहल मेथर यांनी आपल्या घरी बसविण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरबाबत तक्रार मांडताना मागील महिन्याचे वीज बिल भरलेले असतानाही या महिन्यात अचानक २३३ रुपये भरावयाचे आहेत, असा मॅसेज मोबाईलवरून येऊन तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला, या महिन्याची वीज बिल देयक तारीख २० मार्च असतानाही त्यापूर्वीच चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला, असे सांगत या प्रकारबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

याबाबत नितीन बाळके व इतर ग्राहकांनीही आवाज उठवत मेथर यांचा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. यावर अभियंता श्री. म्हेत्रे यांनी याविषयी स्मार्ट वीज मीटरबाबतच्या आयटी विभागाशी संपर्क करून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीन वाळके म्हणाले, महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ऊर्जा मित्र बैठक आयोजित केली जात असून वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या ग्राहक पंचायतीकडे मांडव्यात, जेणेकरून बैठकीत त्यावर चर्चा करून वीज प्रश्न मार्गी लावता येतील, असे सांगितले.

ग्राहकांना कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवू नयेत

मालवण शहरासह ग्रामीण भागात वीज ग्राहकांना कल्पना न देता परस्पर जुने वीज मीटर काढून नवीन स्मार्ट वीज मीटर बसविले जात असल्याबाबत ग्राहकांनी नाराजी व्यक्त करत जाब विचारला. ग्राहकांना कल्पना दिल्याशिवाय स्मार्ट मीटर वसवू नयेत, अशी मागणी यावेळी नितीन वाळके यांनी करत या मीटरमुळे ग्राहकांना अनेक समस्याही जाणवत असल्याचे सांगितले.

तर अरविंद मोंडकर यांनी स्मार्ट बीज मीटर या भागातील तांत्रिक अडचणींमुळे खराब होत असून अनेक वेळा रिडींग अचानक वाढणे, बिल न भरल्यास तात्काळ वीज खंडित होणे या प्रकाराने ग्राहक त्रस्त असल्याचे सांगितले. यावर अभियंता श्री. म्हेत्रे यांनी स्मार्ट वीज मीटरबाबतच्या शंका दूर कारण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येईल, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT