कुडाळ : मालवण तालुक्यातील चार ग्रामपंचायत क्षेत्रांतील सहा गावांमध्ये 2025-26 पासून या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शेतकर्यांमध्ये जनजागृती करून नैसर्गिक शेतीच्या संकल्पना दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी दिली.
विषमुक्त अन्न उत्पादन ही आजच्या काळातील प्राथमिक गरज ठरली असून, रासायनिक खते व औषधांचा अवाजवी वापर, सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा व परिणामी जमिनीची कमी होत चाललेली सुपीकता या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाव पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान 125 शेतकरी निवडून त्यांना कमाल एक एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात पुढील दोन वर्षांत मालवण तालुक्यात सुमारे 300 हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकर्यांच्या जनजागृतीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सखी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना काडी-कचर्यापासून सेंद्रिय खत तयार करणे, जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारखी पीक संरक्षण औषधे गावातच तयार करणे याचे प्रशिक्षण दिले जाणार असून, आवश्यक तेथे अनुदानही उपलब्ध करून दिले जाणार आहे. परिणामी, नैसर्गिक पद्धतीने तयार झालेल्या शेतमालाला भविष्यात अधिक मागणी व उत्तम दर मिळण्याची अपेक्षा आहे, असे श्री.करंदीकर म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती बैठकीत मंजूर झालेल्या व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानासाठी निवडलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे - तिरवडे, नांदोस, कुमामे-गोळवण-डिकवल, तळगाव. याबाबतची माहिती मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी दिली.