मालवण : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेकडून विविध कामांना वेग देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती, पार्किंग झोन तयार करणे, स्ट्रीट लाईट दुरुस्ती तसेच स्वच्छता विषयक कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले, आ. नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासन तत्पर आहे. शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील खड्डे बुजवून पावसाचा अंदाज घेत रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे.
मालवण कचेरी, फोवकांडा पिंपळ, भरडनाका ते देऊळवाडा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सवात शहरातील वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन पार्किंग झोन तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये बॅरिकेट्स, सूचना फलक लावणे, वाहनतळांचे सीमांकन आणि पट्टे मारण्याची कामे करण्यात येणार आहेत.
तसेच शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी हटविण्याचे काम नगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास प्रतिबंधक फवारणी मोहीमही राबविण्यात येत असून, हे काम आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
गणेश विसर्जन स्थळांवरही विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. विसर्जन स्थळांची दुरुस्ती, जलस्रोतातील गाळ काढणे, वाळूचे रॅम्प तयार करणे तसेच आवश्यक प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत. गणेशोत्सव काळात नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.