मालवणात उतरला 'मोठा जलरंक'  pudhari
सिंधुदुर्ग

Malvan News | मालवणात उतरला 'मोठा जलरंक'

पुढारी वृत्तसेवा
उदय बापडेकर

आचरा : मालवणचे पर्यटन प्रामुख्याने समुद्राशी निगडित आहे. या ठिकाणी सागरी पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालते. त्यामुळे दररोज हजारो पर्यटक दरदिवशी मालवण येत असतात. याठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा ड्रायव्हिंग, मालवण मधील पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारं रॉक गार्डन, पर्यटकांना नेहेमीच आकर्षित करतं. अशा या निर्सग सुंदर मालवण मध्ये एक पाहुणा फार लांबून आणि फार मोठा प्रवास करून मालवणात दाखल झाला आहे. तो पाहुणा इतर कोणी नसून 'मोठा जलरंक' नावाचा पक्षी आहे.

या पक्षाला आपल्या कॅमेरा मध्ये टिपलं आहे पक्षी मित्र डॉ. श्रीकृष्ण मगदूम यांनी. या पक्षाचं इंग्रजी नाव 'ग्रेट नॉट' असं आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी सैबेरियातून दक्षिण आशियात येतात. मध्यम आकार असणाऱ्या या पक्षाची चोच गडद तपकीरी, काळपट रंगाची असते. हा पक्षी पांढरट-करड्या रंगाचा असून, याचे पाय पिवळसर तपकिरी रंगाचे असतात. अशी माहिती डॉ. श्रीकृष्ण मगदूम यांनी दिली.

रविवार पासून हा पक्षी आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. हिवाळ्यादरम्यान, दक्षिण भारतातील किनारपट्टी भागातील समुद्रकिनारे आणि चिखलठाणांवर खाद्य मिळविण्यासाठी चोचीने रेती आणि चिखल चिवडताना ते आपल्याला दिसतात. क्वचित प्रसंगी समुद्र किनाऱ्यालगत सपाट खडकाळ भागांवरही हे आढळून येतात. छोटे किडे आणि छोटे कवच असणारे प्राणी हे यांचं मुख्य खाद्य आहे.

गेल्या काही वर्षांपासून या पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे इंटरनॅशनल 'युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर' या संस्थेने या पक्षाचा समावेश संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत केला आहे. प्रदुषण आणि अधिवासाचा हास ही या पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून हा पक्षी मालवण रॉक गार्डन परिसरात वास्तव्यास आहे. पक्षी निरीक्षक ओंकार गावकर आणि प्रज्ञा गावकर हे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT