Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Malvan Accident : बनाना राईडवरून समुद्रात पडून पर्यटक महिलेचा मृत्यू, मालवण-दांडी समुद्रात दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण -दांडी समुद्रात बनाना राईड करताना समुद्रात पडून अत्यवस्थ बनलेल्या शीतल शशिकांत मठकर (45, रा. अंबरनाथ, मुंबई) या पर्यटक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली.

सौ. शीतल मठकर या नवरा, मुलगा, दीर, भावजय अशा नऊ जणांसोबत शुक्रवारी मालवण -देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबाग मधील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस पर्यटन स्थळे फिरून शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही साजरा केला होता. रविवारी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास हे पर्यटक मालवण- दांडी येथे वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले. समुद्रात शीतल मठकर या नातेवाईकांसोबत बनाना राईडचा आनंद घेत होत्या. या दरम्यान समुद्राच्या पाण्यात पडल्या. त्या अत्यवस्थ बनल्याने पर्यटनासाठी आलेल्या एका डॉक्टरने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर मालवण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तपासणी करत मठकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले.

शीतल मठकर यांच्या अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे नवरा, मुलगा व नातेवाईकांना मोठा धक्का बसला व त्यांनी एकच टाहो फोडला. मालवण व दांडी येथील वॉटरस्पोर्ट्स व्यवसायिकानी मठकर यांच्या नातेवाईकांना धीर दिला. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT