ओरोस : पुढारी वृत्तसेवा
वायंगणी-मोबारवाडी येथे दोन महिन्यांपूर्वी झालेली तब्बल २० लाख रुपयांच्या दागिन्यांची घरफोडी दुसरी-तिसरी कोणी नसून त्या घरातच काम करणाऱ्या मोलकरणीने केली असल्याचे उघड झाले आहे. वेंगुर्ले पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मार्टिना डुमिन लुद्रिक (२७, रा. दामोली-मोबारवाडी) हिला अटक केली असून, तिच्याकडून ५१५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
या कारवाईची सविस्तर माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी पत्रकारा परिषदेत दिली. सलोनी सुधीर लोलयेकर (७२) यांच्या घरात ही चोरी झाली होती. दोन महिन्यांपूर्वी सलोनी यांचा अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ मुंबईला जावे लागले.
या धावपळीत घरातील दागिन्यांची पेटी सुरक्षित ठेवणे त्यांना शक्य झाले नाही. उपचार घेऊन घरी परतल्यानंतर पेटी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. २३ सप्टेंबर रोजी त्यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली.
'त्या' एका दागिन्याने केला घात:
लोलयेकर यांच्या घरात संरक्षित कुत्रे असल्याने बाहेरकडील व्यक्ती चोरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे घरात काम करणाऱ्या चार जणांवर पोलिसांचा संशय होता. पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांनी मार्टिना हिच्यावर पाळत ठेवली.
काही दिवसांपूर्वी तिने या चोरीतील एक दागिन्या नव्याने घडवण्यासाठी सराफाकडे नेला आणि पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तिने हे सर्व दागिने राहत्या घराजवळच्या एका पडक्या घरात लपवून ठेवले होते. पंचांसमक्ष ते हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेची अवघ्या काही दिवसांत उकल केल्याबद्दल वेंगुर्ले पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.