महावितरण file photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग महावितरण व्यवस्थेत कुछ तो गडबड है

अभियंत्यांनीच केला गौप्यस्फोट : वीज ग्राहक व नागरिकांच्या संशयाला बळ

पुढारी वृत्तसेवा
प्रमोद म्हाडगुत

सिंधुदुर्ग : मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची व्यवस्था कोलमडून गेली, ती कंत्राटी वायरमन व एजन्सीच्या मदतीने कशीबशी पूर्ववत करण्यात आली. पण याच दरम्यान वेंगुर्ला तालुक्यातील दोन अभियंत्यांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन केल्याच्या आरोपावरून वीज अभियंत्यांनी महावितरण प्रशासनाने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस नियोजन न केूल्याचा आरोप करत महावितरणलाच कोंडीत पकडले. यामुळे महावितरणच्या व्यवस्थेमध्ये ‘कुछ तो गडबड है’ या संशयाला पुष्टी मिळाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची व्यवस्था कुडाळ व कणकवली या दोन विभागात विभागली गेली आहे. दोन्ही विभागात मिळुन जवळपास 3 लाख वीज ग्राहक(घरगुती, खाजगी, औद्योगिक ) आहेत. या वीज ग्राहकांच्या सेवेसाठी 504 वायरमन पदे मंजूर आहेत, पण प्रत्यक्षात बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे विविध एजन्सीद्वारे 455 कंत्राटी वायरमन भरलेआहेत.त्यासाठी कुडाळ व कणकवली या दोन विभागासाठी 6 एजन्सीची नेमणूक केली आहे.त्या कंत्राटी वायरमनवरच सिंधुदुर्ग महावितरणचा डोलारा उभा आहे.पण दुर्दैवाची बाब म्हणजे या वायरमनना आवश्यक सेफ्टी किट ठेकेदाराकडून पुरविली जात नाहीत.त्यामुळे गेल्या काही वर्षीत डझनभरहुन अधिक वायरमनांना आपला जीव गमावावा लागला तर काही जण जखमी होवून अपंग बनले आहेत.

सिंधुदुर्ग हा भौगोलीक दृष्ट्या खडतर जिल्हा म्हणून घोषित आहे. तरीही येथे महावितरणकडे ना पुरेसे मनुष्यबळ, ना आवश्यक साहित्य, ना वेळेवर उपलब्ध एजन्सी. तरीही अभियंते जीव धोक्यात घालून, अपुर्‍या साधनसामुग्रीत जिल्ह्याचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रात्रंदिवस झगडत आहेत.

सिंधुदुर्ग महावितरण प्रशासनाने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस नियोजन केले नाही. वीज व्यवस्था कोलमडली तर ती पूर्व पदावर आणण्यासाठी एजन्सीकडे मदतीची भीक मागावी लागते. मे महिना उजाडला तरी वीज अधिकार्‍यांचे लक्ष फक्त वसुलीवर केंद्रीत होते, असा थेट आरोप महावितरणच्या अभियंत्यांनी कुडाळ मधील आंदोलना दरम्यान केला. अभियंत्यांनी महावितरणच्या व्यवस्थेवरच थेट आरोप केल्यामुळे वीज ग्राहक व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत महावितरणच्या व्यवस्थेबाबत अनेक आरोप, तक्रारी होत होत्या. पण त्या तक्रारींबाबत कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हत.ं पण आता महावितरण व्यवस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणार्‍या अभियंत्यांकडुनच महावितरणवरच थेट आरोप होत असतील तर त्या आरोपात काही तरी तथ्य असणार हे निश्चित. आता महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनीच जुने इन्फास्ट्रक्चर हेच वीज खंडित होण्यास कारणीभूत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या परिस्थितीचा अंदाज ग्राहकांना आला आहे.

ठेकेदार व अधिकार्‍यांमध्ये अर्थपूर्ण युती?

महावितरण विभाग कोट्यवधी रुपये खर्चून एजन्सी मार्फत महावितरण ची व्यवस्था भक्कम करण्याची कामे करत असते. मात्र असे असून सुद्धा महावितरणची व्यवस्था पावसाळी मौसमात तग का धरू शकत नाही? यावर्षी तर पहील्याच पावसात महावितरणच्या व्यवस्थेचे बारा वाजले.अशातच महावितरणचेच अभियंते महावितरणच्या व्यवस्थेवर बोट ठेवत असतील तर महावितरणच्या कारभारात काहीतरी काळबेरआहे हे निश्चित. याच महावितरणच्या कोट्यावधी रूपयांच्या निविदनांच्या कामांमध्ये केवळ परवडणारी कामेच केली जातात, इतर कामं जैसे थे ठेवली जातात, असाही आरोप केला जात आहे. यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी यांची अर्थपूर्ण युती असल्याची चर्चा आहे.

विभाजन झाल्यापासून वीज सेवा कोलमडली!

महावितरण कडून वीज बील वसुलीसाठी तत्परता दाखवली जाते, कुणी बील भरणा केला नाही तर ग्राहकांच्या घरी महावितरणची टिम दाखल होते, काही मीटर बंदावस्थेत आहेत तरी महावितरण कडून अ‍ॅव्हरेज बीलं वीज ग्राहकांच्या माथी मारली जातात. हीच तत्परता महावितरण आपली व्यवस्था भक्कम करण्यासाठी वापरताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात वीज व्यवस्था सुस्थितीत होती मात्र महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या एमएससीबी होल्डिंग कंपनी, महानिर्मिती कंपनी,महापारेशन कंपनी व महावितरण अशा चार कंपन्या 6 जून 2005 रोजी झाल्यापासून वीज व्यवस्था कोलमडून गेली आहे, त्यांचा सर्वाधिक फटका वीज ग्राहकांना बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT