कुडाळ : कुडाळ-भैरववाडी येथे कुडाळ-घोडगे मार्गावर धावणार्या चालत्या एसटीच्या मागील चाकांचा एक्सेल थ्रेड तुटल्याने वाहकाच्या बाजूने मागील एक्सेलसह चाके बाहेर आले. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस ब्रेक केल्याने अनर्थ टळला. दरम्यान रस्त्यावर उभ्या या बसला बाजू देताना समोरून येणारा डंपर तेथे गटारात रूतला. ही घटना बुधवारी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास घडली.
कुडाळ आगाराची कुडाळ - घोडगे एसटी भैरववाडी येथे आली असता, चालत्या बसमध्ये अचानक बिघाड निर्माण झाला. स्टार्टर व गिअर बॉक्स फेल झाला. त्यामुळे मागील चाकांच्या एक्सेलचे थ्रेड लूज झाले. त्यामुळे एसटीचे मागील टायर एक्सेलसह बाहेर आले. ही बाब चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने चालकान बससवर नियंत्रण मिळवले.
बुधवार हा कुडाळचा आठवडा बाजार असल्याने प्रवासी व नागरिकांची या बसमध्ये तोबा गर्दी होती. जर एक्सेल तुटून चाके बाहेर पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला.
दरम्यान ही नादुरुस्त बस रस्त्यावरच उभी असतानाच, या बसला ओव्हरटेक करण्यासाठी मागावून दुसरी बस जात होती. या दोन्ही बसना बाजू देण्याच्या प्रयत्नात समोरून गांधीचौकच्या दिशेने येणारा डंपर रस्त्यालगत गटारात रूतला. क्लिनर बाजूने पुढील चाक तेथे गटारात रुतले. यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली. दरम्यान ही नादुरूस्त बस नागरिकांच्या मदतीने ढकलून पुढे साईडपट्टीवर उभी करण्यात आली. बसमधील प्रवाशांना दुसर्या बसची व्यवस्था करून मार्गस्थ करण्यात आले. तर रूतलेला डंपर जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला.