काही करायचं असतं तर एकही जिवंत घरी गेला नसता : नारायण राणे File Photo
सिंधुदुर्ग

...तर एकही जिवंत घरी गेला नसता : नारायण राणे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांनी आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने  आज (दि.२८) तणावाची परिस्थीती निर्माण झाली. दरम्यान माध्यमांशी बोलत असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, " आम्हाला करायचे असते तर एकही जिवंत घरी गेला नसता. आम्ही चिरीमिरी उद्योग करत नाही. निवडणूक जवळ आल्याने विरोधकांना राजकारण करायच आहे." (Maharashtra Politics)

पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला

मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना माध्यमांशी बोलत असताना नारायण राणे म्हणाले, " छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ढासळला ही घटना दुर्दैवी आहे. पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला. कोणावर आरोप दोष देण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोणी बांधला आणि बांधणारे लोक या सर्वांची चौकशी केली जाईल. तपासाअंती पुतळ नेमका कश्याने  कोसळला हे पाहिलं जाईल, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल."

महाविकास आघाडी राजकारण करत आहे

पुढे बोलताना राणे म्हणाले, महाविकास आघाडी निवडणुका जवळ आल्याने या घटनेचे राजकारण करत आहेत. या घटनेचे भांडवल करत आहेत. या जिल्ह्यात भाजपवर टीका करण्यासाठी कोणतेही कारण मिळत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा  पुतळा कोसळला हे त्यांना निमित्त मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा  पुतळा या जिल्ह्यात उभा राहीला गेला. पण आज (दि.२८)  बाहेरुन आलेले त्यांनी एकतरी राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभा तरी केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई

माध्यमांशी  बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत नारायण राणे म्हणाले, स्वत:च्या वडिलांचाही पुतळा सरकारच्या पैशातुन त्यांनी बनवला. उद्धव ठाकरे यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही आहे. त्यांना कधीच चांगले बोलता येत नाही." पुढे बोलताना ते म्हणाले, "आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा  उभा करायचा आहे. आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे याच्या पलीकडे आम्हाला काही दिसत नाही.

Maharashtra Politics : नेमके प्रकरण काय आहे?

मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. त्याचवेळी नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह पाहणीसाठी किल्ल्यावर आले होते. त्यामुळे भाजप आणि मविआ कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. (Maharashtra Politics)

आंदोलकांनी किल्ल्याच्या भिंतींवर चढून घोषणाबाजी केली. याचदरम्यान दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकमध्ये हाणामारी झाली. यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. कार्यकर्त्यांना पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते आपआपल्या भूमिकेवर ठाम होते. दोन गटाच्या राड्यात किल्ल्याचे नुकसान झाले. पोलिसांनीच मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT