कणकवली ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. दरवर्षी प्रमाणे कोकण बोर्डाने राज्यात सर्वाधिक निकालाची परंपरा सलग चौदाव्या वर्षी कायम राखली आहे. कोकण बोर्डाचा निकाल राज्यात सर्वाधिक 96.74 टक्के लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही राज्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 98.74 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 95.67 टक्के लागला आहे. सिंधुदुर्गात कुडाळ हायस्कूल ज्यु. कॉलेजची आयुषी दिनेश भोगटे ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी 95.17 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे तर ओरोस डॉन बॉस्को ज्यु. कॉलेजची चैत्राली राजेश वळंजू ही 95 टक्के गुण मिळवून द्वितीय, आरपीडी ज्यु. कॉलेजचा तनूज नीलेश परब हा 94.83 टक्के गुण मिळवून तृतीय, याच कॉलेजची तजीन असिफ खान व वराडकर ज्यु. कॉलेजचा सोहम लाड हे 94.67 टक्के गुण मिळवून चतुर्थ आणि कणकवली महाविद्यालयाचा तन्मय संजय सावंत हा 94.33 टक्के गुण मिळवून पाचवा आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत.
गेली चौदा वर्षे सातत्याने कोकण बोर्डाची सर्वाधिक निकालाची सुपरफास्ट एक्स्प्रेस कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोकण बोर्डामध्ये यंदा बारावी परीक्षेसाठी 23,627 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील 23,563 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यातून 22,797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 11,418 मुलगे आणि 11,379 मुली असून दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल 97.51 टक्के तर सिंधुदुर्गचा निकाल 98.33 टक्के लागला होता.
यंदा सिंधुदुर्गच्या निकालात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी यंदा 8286 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील 8266 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यामध्ये 8162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 98.23 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.23 टक्के आहे. विशेष म्हणजे यंदा शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबवुनही सिंधुदुर्गच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्या टक्केने वाढ झाली आहे हे विशेष.
सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्या खालोखाल वैभववाडी तालुक्याचा निकाल 99.69 टक्के, वेंगुर्ले 99.67 टक्के, मालवण 99.36 टक्के, कणकवली 99.22 टक्के, कुडाळ 98.90 टक्के, देवगड 97.99 टक्के तर सावंतवाडी तालुक्याला निकाल 97.40 टक्के लागला आहे.
विषयवार बारावी परीक्षेचा निकाल पाहता सिंधुदुर्गचा वाणिज्य शाखेचा सर्वाधिक 99.55 टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल विज्ञान शाखेचा 92.52 टक्के, कला शाखेचा 96.13 टक्के, व्होकेशनल शाखेचा 98.15 टक्के, तर टेक्निकल्स सायन्सचा निकाल 90.90 टक्के लागला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेतून 3166 विद्यार्थी, कला शाखेतून 1594 विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून 2937 विद्यार्थी, व्होकेशनल शाखेतून 425 विद्यार्थी आणि टेक्निकल सायन्स शाखेतून 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 44 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
पुनर्परिक्षार्थींचा सिंधुदुर्गजिल्ह्याचा निकाल 80.31 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून 193 पैकी 155 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये दोडामार्ग तालुक्याचा निकाल 100 टक्के, देवगड 65 टक्के, कणकवली 87.69 टक्के, कुडाळ 64.70 टक्के, मालवण 85.71 टक्के, सावंतवाडी 66.66 टक्के, वैभववाडी 96.42 टक्के, वेंगुर्ले तालुक्याचा निकाल 87.50 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पुनर्परिक्षेचा निकाल 75 टक्के लागला आहे.
एकूणच कोकणातील मुलांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिध्द केली असून राज्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल 97.51 टक्के लागला होता. यावर्षी त्यामध्ये एक टक्क्यानी घट होवून निकाल 96.74 टक्के लागला आहे. परंतु कोकण बोर्डाने आपली राज्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आता निकाल वेळेवर लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात बारावीच्या निकालात सलग चौदाव्या वर्षी कोकण बोर्डाने बाजी मारली आहे. कोकण बोर्डाचा बारावीचा निकाल सर्वाधिक 96.74 टक्के लागला आहे. त्या खालोखाल कोल्हापूर बोर्डाचा निकाल 93.64 टक्के, मुंबई बोर्डाचा निकाल 92.93 टक्के, छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निकाल 92.24 टक्के, अमरावती बोर्डाचा 51.43 टक्के, पुणे बोर्डाचा निकाल 91.32 टक्के, नाशिक बोर्डाचा 91.31 टक्के, नागपूर बोर्डाचा 90.52 टक्के तर लातूर बोर्डाचा 89.46 टक्के लागला आहे.
दरवर्षी साधारपणे मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल मंडळाकडून जाहीर केला जात असे. मात्र गतवर्षीपासून निकाल मेच्या मध्यानीच लावला जात आहे. यंदा तर मेच्या पहिल्या आठवड्यातच 5 मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल लावून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने राज्याच्या आजवरच्या इतिहासात विक्रम केला आहे. लवकर निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक ती प्रक्रिया करणे सोयीचे होणार आहे. लवकर लागलेल्या निकालामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. गुण पडताळणीसाठी 6 मे ते 20 मे पर्यंत विहित नमुन्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.