कुडाळ : आज सर्वात जास्त गोडवा असलेली कोणती बोलीभाषा असेल तर ती ‘मालवणी बोलीभाषा’ आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी भाषा कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून त्यात मालवणी बोलीभाषेवर रिसर्च केले जाईल. मालवणी बोलीभाषेचा शब्दकोश तयार करण्याचे आपले प्रयत्न आहेत. जेणेकरून पुढील पिढीला याची माहिती मिळेल. तसेच रत्नागिरीत लवकरच मोफत एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अकॅडमी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित ‘केपीएल अश्वमेध-२०२५’ गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, पत्रकार शेखर सामंत, संजीवनी देसाई, सुलभा देसाई, वेंगुर्ले उपसभापती सचिन देसाई, गौड ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष तथा केपीएलचे क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, जि. प. सदस्य आरती पाटील, पं. स. सदस्य मंगेश प्रभू यांच्यासह सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, गोवा, बेळगाव आदी भागांतील पदाधिकारी आणि ज्ञातीबांधव उपस्थित होते.
राजकारणातही आपल्या ज्ञातीने वेगळा ठसा उमटविला
मंत्री सामंत म्हणाले, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी प्रकाशित केलेला ‘केपीएल अश्वमेध’ गौरवग्रंथ निश्चितच प्रेरणादायी ठरेल. केपीएल महोत्सवाला सातत्याने पुढे नेण्यासाठी दरवर्षी आयोजन व्हावे, त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील. आज आपल्या ज्ञातीतील अनेक जण विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. राजकारणातही आपल्या ज्ञातीने वेगळा ठसा उमटविला आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर संघर्ष करावा लागतो. आम्ही देखील संघर्ष केला आहे, म्हणूनच आज या पदापर्यंत पोहोचलो आहोत. आज आपल्या ज्ञातीचे कार्य चांगले आहे. आदर्श नागरिक घडवायचे असेल तर प्रत्येकाने मोठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे. मनीष दाभोलकर यांनीही मार्गर्शन केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी आभार मानले.