सावंतवाडी ः नेमळे गावात हत्तीरोगाचे संशयित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. झारखंड येथून वीटभट्टी कामासाठी आलेल्या 28 पैकी 4 कामगारांमध्ये हत्तीरोग सदृश लक्षणे आढळून आली आहेत. आरोग्य विभागाने यावर तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शासन आदेशानुसार, परराज्यातून आलेल्या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे. त्यानुसार नेमळे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या झारखंडमधील 28 कामगारांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागाने घेतले होते. या प्राथमिक तपासणीत 4 कामगार हत्तीरोगसदृश असल्याचे निष्पन्न झाले.
आरोग्य विभागाची भूमिका
संबंधित चारही कामगारांवर सध्या आरोग्य विभागामार्फत उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कामगारांच्या रक्ताची पुन्हा सखोल चाचणी केली जाणार आहे. जर या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर खबरदारीचा उपाय म्हणून या कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात येईल.
ग्रामपंचायतीकडून प्रतिबंधात्मक उपाय
हत्तीरोग हा डासांमार्फत पसरणारा आजार असल्याने नेमळे ग्रामपंचायतीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील संबंधित भागात आणि वीटभट्टी परिसरात जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता डासांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.