स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात घमासान File Photo
सिंधुदुर्ग

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात घमासान

Maharashtra Election Result | महायुतीच्या भक्कम यशामुळे मुंबईसह राज्यातील महापालिकेत सत्तासंघर्ष रंगणार

पुढारी वृत्तसेवा
चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

राज्यात गेली काही वर्षे न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांकडूनच दिले गेल्याने या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला व विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम यश मिळाल्यामुळे या निवडणुकीत घमासान होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीत फूट स्पष्ट झाली आहे; तर महायुती आता राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर त्या त्या पक्षाचे नेते वर्चस्वासाठी प्रयत्न करणार असल्याने महायुतीत अंतर्गत वर्चस्वासाठी संघर्ष शक्य आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. मात्र हा झंझावात विधानसभा निवडणुकीत टिकविण्यात त्यांना यश आले नाही. विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 230 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महायुतीत भाजपच दादा आहे. त्यांना 132 जागांवर यश मिळाल्याने मुख्यमंत्रिपदही आपसूकच भाजपकडे आले आहे. शिंदे शिवसेनेला 57 जागांवर तर अजित पवार राष्ट्रवादीला 41 जागांवर यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला 46 जागांवर यश मिळाले आहे. त्यामध्ये ठाकरे शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 तर शरद पवार राष्ट्रवादीला 10 जागांवर यश मिळाले असून 12 अपक्षांनी बाजी मारली आहे.

ठाकरे शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील समावेशानंतरच पक्षाला सातत्याने अपयश मिळत असल्याची सार्वत्रिक टीका होत असताना आता ठाकरे शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे शिवसेनेसाठी मुबंई महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून त्यांच्यात व महायुतीमध्ये जोरदार संघर्ष होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान नगरपालिका, नगरपंचायती पातळीवर स्थनिक विकास आघाड्या तयार होण्याची शक्यता आहे; तर ग्रामीण भागात तालुक्यातील पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी स्थानिक आमदार व पराभूत उमेदवार यांच्यात जोरदार संघर्ष होणार आहे. याच माध्यमातून जिल्हा परिषदांवर सत्ता स्थापन करण्यासाठीही महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.

महायुतीला वर्चस्वाची मोठी संधी...

महायुतीला राज्यात 230 जागा मिळाल्या आहेत. 1995 साली राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार होते. तेव्हा काही ठिकाणी त्यांना ग्रामीण भागात मर्यादित प्रमाणात यश मिळाले. आता भाजप 132 जागांवर यशस्वी झाला असून, ग्रामीण भागातही त्यांना चांगले यश मिळाले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात ताकद असणारे शिंदे शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. त्यामुळे महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्वासाठी मोठी संधी आहे.

द़ृष्टिक्षेपात स्थानिक स्वराज्य संस्था

जिल्हा परिषदा - 34

ग्रामपंचायती - 27,913

पंचायत समित्या - 351

नगरपालिका- 245

महापालिका - 29

नगरपंचायती - 146

कँटोन्मेंट बोर्ड- 7

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT