खांबाळेत बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीती 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : खांबाळेत बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीती

खांबाळे-चव्हाटेवाडी येथे बिबट्याची मादी आणि तिचे दोन बछडे दिसून आल्याने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : खांबाळे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, वस्तीजवळच बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी खांबाळे-चव्हाटेवाडी येथे एका महिलेला बिबट्याची मादी आणि तिचे दोन बछडे दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यानंतर ग्रामस्थांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत शनिवारी सायंकाळी वन विभागाचे पथक गावात दाखल झाले.

गुरुवारी रात्रीही खांबाळे-कोकिसरे मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले होते. खांबाळेचे माजी उपसरपंच गणेश पवार, त्यांचे सहकारी विक्रांत पवार आणि जयेश पवार हे कारमधून प्रवास करीत असताना त्यांना रस्त्यावर बिबट्या दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचे छायाचित्र व व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावराची अधिकच चर्चा सुरू झाली आहे.

शुक्रवारी चव्हाटेवाडी परिसरात मादी बिबट्या व तिचे दोन बछडे दिसल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर नागरिकांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. मादीसोबत दोन बछडे असल्याने ती अधिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वन विभागाचे पथक दाखल..

बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी वन विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनपाल सुरेश पटकारे व वनरक्षक रामदास घुगे शनिवारी सायंकाळी खांबाळे गावात दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने बिबट्याच्या वावराच्या ठिकाणी पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सायंकाळी जलद कृती दलालाही पाचारण करण्यात आले.

ग्रामस्थांमध्ये वाढली चिंता

गावाच्या वस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मादीसोबत दोन बछडे असल्याचे समोर आल्याने नागरिक अधिक सतर्क झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस या परिसरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच रविवारी बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
- सुरेश पटकारे, वनपाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT