कुडाळ : कुडाळ तालुक्यातील डिगस व हुमरमळा गावांच्या सीमेवरील परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. हुमरमळा ते डिगस खांदीचेगाळू रस्त्यालगत मोटरसायकलस्वाराला बिबट्याचे थेट दर्शन झाले. लोकवस्ती लगत बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
डिगस आणि हुमरमळा गावांच्या सीमेवर असलेल्या चिरेखाण डोंगरात दरवर्षी बिबट्याचा वावर आढळून येतो. दोन दिवसांपूर्वीच डिगस खांदीचे गाळू नजिक मुख्य रस्त्यालगत रात्रीच्या सुमारास एका वाहना समोर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्याचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
त्यानंतर मंगळवारी सायंकाळी 3.45 वा. च्या सुमारास डिगस खांदीचे गाळू नजीक डिगस ते हुमरमळा श्री देव चव्हाटेश्वर मंदीर रस्त्यालगत श्री गवळदेव येथे एका मोटरसायकलस्वाराला बिबट्याचे दर्शन झाले. तेथे झाडाखाली शांतपणे बसलेल्या त्या बिबट्याची छबी त्या मोटरसायकलस्वाराने मोबाईल मध्ये कैद केली. बिबट्याचा टिपलेला हा फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.
या परिसरात हुमरमळा ग्रामस्थांची शेती आहे. तसेच डिगस आणि हुमरमळा मधील शेतकरी त्या परिसरात गुरे चारणीसाठी सोडतात. शेळ्या, बकर्याही चरण्याणीसाठी याच भागात सोडल्या जातात. मुंबई-गोवा महामार्गाला हुमरमळा येथे जोडणारा डिगस खांदीचेगाळू येथून शॉर्टकट रस्ता असल्याने या रस्त्याने वाहनांची रहदारी असते. मात्र, बिबट्याच्या मुक्त संचारामुळे या भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची दखल घेऊन उपाययोजना तसेच बंदोबस्ताबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.