वैभववाडी : मांगवली-आयरेवाडी येथील एका तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विजय अशोक आयरे (वय 27)असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री 9.30 वा.च्या सुमारास आयरेवाडी पुलानजीक घडली.
त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत प्राण्यावर हल्ला करणार्या बिबट्याने माणसावर हल्ला केल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मांगवली-आयरेवाडी येथील विजय आयरे यांचे शेतकरी कुटुंब आहे. त्यांची गुरे बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत घरी आली नव्हती.
त्या गुरांना शोधण्यासाठी विजय आयरे व त्याचा पुतण्या गंधार आयरे हे दोघे मोटारसायकल घेऊन वेंगसरच्या दिशेने जात होते. दरम्यान, विजय हे आयरेवाडी पुलानजीक लघुशंकेसाठी नदीकाठावर गेले असता नदीतील झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर थेट हल्ला केला. बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी त्यांनी बिबट्याशी झटापट केली.
यात बिबट्याने त्यांच्या डोकीवर, डाव्या पायावर व चेहर्यावर पंज्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. विजय व त्यांच्या पुतण्याने केलेल्या आरडाओरडामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. पुतण्या गंधार याने जखमी अवस्थेत विजय यांना प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे रात्री 11 वा. दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत येथील डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. विजय यांची प्रकृती आता ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या डोक्यावर जखम असल्यामुळे त्यांना सिटीस्कॅन करण्याचा सल्ल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले. वैभववाडी तालुक्यासह मांगवली व मांगवली पुनर्वसन गावठाण परिसरात गेले काही महिने बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून त्याच्याकडून शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत.
मांगवली पुनर्वसन येथे तर अनेकवेळा बिबट्या वस्तीत फिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांकडून वन विभागाकडे करण्यात येत आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन
बिबट्याकडून वारंवार शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात आहे. याबाबत वनविभागाला माहिती देऊनही वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आता तर या बिबट्याने माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मांगवली सरपंच शिवाजी नाटेकर यांनी दिला आहे.