दोडामार्ग : तिलारी घाटातून एसटी बस पूर्ववत सुरू करण्यासाठी कोल्हापूर विभाग नियंत्रकांनी हिरवा कंदील दिला आहे. बुधवारी २ एप्रिलपासून घाटातून लालपरी धावणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची एसटी साठीची प्रतीक्षा तब्बल नऊ महिन्यांनंतर अखेर संपली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार तिलारी घाट २० जून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत एसटीसह अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले होते. यावेळी एसटी बंद झाल्याने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू लागला. शिवाय प्रवासासाठी आंबोली घाट, चोर्ला घाट मार्गे वळसा पडू लागला होता. मात्र घाटातून अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू होती. या घाटातून एसटी वाहतुक पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गडहिंग्लज प्रांताधिकारी व संबंधित इतर अधिकाऱ्यांना घाट रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तसेच सखोल चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभाग व एसटी विभाग यांच्यामध्ये हा प्रश्न अडकला होता.
प्रविण गवस, दत्ताराम देसाई, कोदाळी (ता. चंदगड) माजी सरपंच अंकुश गावडे यांसह स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटी सुरू होण्यासाठी वारंवार आंदोलने, उपोषणे केली होती. त्यामुळे प्रशासन नरमले व घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम मंजूर करून घेत लवकरात लवकर काम पूर्ण केले. त्यानंतर चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने एसटी विभागाला पत्र देत घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे कळविले होते. यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांनीदेखील घाटातून एसटी बस सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे संबंधित विभागाकडे केली होती. मात्र स्थानिक आमदारांच्या मागणीकडे कानाडोळा करत घाटात धोकादायक ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्याची मागणी एसटी विभागाने चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे केली.