सुरज कोयंडे
देवगड ः ‘हर हर महादेव’च्या नामघोषात सोमवारी दुसऱ्या दिवशीही श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री यात्रोत्सवाला भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. शिवभक्तांच्या या गर्दीने कुणकेश्वरनगरी भक्तिभावाने फुलून गेली होती. यात्रेच्या दोन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. मंगळवारी अमावस्येच्या मुहूर्तावर देवस्वाऱ्या व शिवभक्तांचे समुद्र स्नान होणार असून या कार्यक्रमाने महाशिवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
सोमवारी सायंकाळी 5.33 वा.नंतर अमावस्या सुरू झाली असून मंगळवारी पहाटे पवित्र तीर्थस्नान होणार आहे. यासाठी सोमवार सायंकाळपासूनच कुणकेश्वर तीर्थस्थानाकडे भाविकांची वर्दळ वाढली आहे. सायंकाळनंतर यात्रेत भाविकांचा गर्दीचा ओघ वाढल्याचे चित्र होते. यात्रेच्या पहिल्या दोन दिवसात लाखो भाविकांनी श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये उपस्थिती लावत श्री. कुणकेश्वराचे दर्शन घेतले. महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी जिल्ह्यातील चार देवस्वाऱ्या आल्या होत्या. यामध्ये श्री देव लिंगेश्वर-पावणाई देवस्थान जानवली, ता. कणकवली, श्री देव नागेश्वर-पावणादेवी देवस्थान-नागवे, ता.कणकवली या देवस्वाऱ्या यात्रोत्सवादिवशी आल्या तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री पावणाई -रवळनाथ देवस्थान मालोंड -बेलाचीवाडी, ता. मालवण व श्री देव गांगेश्वर देवस्थान नारिंग्रे,ता. देवगड या देवस्वाऱ्या दाखल झाल्या.
श्री कुणकेश्वर मंदिरात गेलेे दोन दिवस अखंड भजने सुरू असून यात जिल्ह्यातील प्रसिध्द व नामवंत भजनीबुवांनी आपली भजन सेवा श्री कुणकेश्वर चरणी अर्पण केली. यात्रे निमित्त मंदिर परिसर, बाजारपेठ तसेच समुद्र किनाऱ्यावर विविध साहित्याची व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कलिंगड बाजारात कलिंगड खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. श्री कुणकेश्वर मंदिर व परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
कुणकेश्वर यात्रेच्या ठिकाणी विविध शासकीय योजना तसेच आरोग्य विषयक माहिती देणारे व धार्मिक माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. पवित्र तीर्थस्नानासाठी समुद्रात उतरणाऱ्या भाविकांना अपघात हो ऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस व स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी दक्ष आहेत. कुणकेश्वर हायस्कूल ते एस्टी स्टँड, पर्यटन संकुल परिसर व मंदिराच्या मागील बाजुस तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वाहन पार्कींगची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर आदी ठिकाणांहून शिवभक्त मोठ्या संख्येने श्री कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व पवित्र तीर्थस्नानाचा लाभ घेण्यासाठी कुणकेश्वरमध्ये दाखल होत आहेत.