कुणकेश्वर ः श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्रोत्सव निमित्त सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवपिंडीची विधिवत पूजाअर्चाही केली. कुणकेश्वर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते कोकणची सांस्कृतिक ओळख सांगणारे केंद्र आहे. जागतिक पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन केंद्र असलेल्या कुणकेश्वरचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट व प्रशासन यांच्या समन्वयातून सर्व समावेशक विकास आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन ना. राणे यांनी दिले.
कुणकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ना. नीतेश राणे यांनी भाविकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात श्री देव कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद राहिला आहे. या परिसराचा नियोजनबद्ध पर्यटन विकास करणे ही पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. यात्रोत्सव काळात लाखो भाविक कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येतात. याबरोबरच वर्षभर येथे पर्यटक व भाविकांची गर्दी असते. या भाविकांच्या व पर्यटकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल यामध्ये परिसराची दैनंदिन स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, वाहतूक व्यवस्था व वाहन पार्किंग सुविधा, प्रकाश योजना, सागर किनाऱ्यावरील सुरक्षा यासारख्या कामांचा समावेश असेल.
जिल्हा प्रशासनाने यात्रेचे योग्य नियोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावर्षी कुणकेश्वर यात्रोत्सव हा ‘प्लास्टिक मुक्त’ यात्रा म्हणून प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम अनुकरणीय असून यापुढे जिल्हयाच्या गावागावातील यात्रांमधून याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा ना. राणे यांनी व्यक्त केली. देवस्थान समितीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व भाविक उपस्थित होते.