सावंतवाडी : कुणकेरी परिसरात दूरसंचारची मोबाईल सेवा वारंवार विस्कळीत होत असून, ग्रामस्थांनी बीएसएनएलचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सावंतवाडी येथील दूरसंचार मुख्य प्रबंधक कार्यालयावर धडक देत संबधित अधिकार्यांना जाब विचारला. यावेळी अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे देताच ग्रामस्थ संतप्त झाले.
मागील दोन वर्षांपासून कुणकेरी परिसरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. या संदर्भात आम्ही तुम्हाला वारंवार अर्ज, निवेदने दिली; परंतु त्याचा काडीमात्र फरक तुम्हा अधिकार्यांना पडत नाही, असे सांगत ग्रामस्थांनी दूरसंचार अभियंत्यांना धारेवर धरले. गावात दूरसंचारचा मोबाईल टॉवर असूनही त्याचा उपयोग होत नाही. वीज पुरवठा खंडित झालाकी हा टॉवर लगेच बंद पडतो, परिणामी परिसरातील नेटवर्कही गायब होते. या टॉवरला असलेली बॅटरी बॅकअपची सिस्टम गेली 2 ते 3 वर्ष बंद अवस्थेत आहे. मात्र आपण याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार या ग्रामस्थांनी मांडली. यावर अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.
मंगेश सावंत, भरत सावंत, विनायक सावंत, विश्राम सावंत, अभिजीत सावंत,मनोज घाटकर, दादा खडपकर, एकनाथ सावंत, महादेव गावडे, विनोद सावंत, बाळकृष्ण सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिकार्यांच्या बेजबाबदार उत्तरामुळे संतापलेल्या ग्रामस्थ्यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. आम्ही रिचार्ज पूर्ण महिन्याचे करतो आणि सेवा मात्र 20 दिवसही मिळत नसेल तर टॉवर बंद करा; पण लोकांचे असे नुकसान करून फुकट पैसे लाटण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा कडक शब्दात अधिकार्यांना सुनावले. तसेच सेवा सुरळीत न झाल्यास स्वातंत्र्य दिनी कार्यालसमोर उपोषण करणार असल्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
आम्ही कंपनीकडे बॅटर्या पुरविण्यासाठी मागणी केली आहे, आमच्याकडे वस्तू आली तर आम्ही लावणार! आम्हाला भेटून काही होणार नाही. तुम्ही खासदारांना भेटा, त्यांना निवेदन द्या अशी उडवाउडवीची उत्तरे या अधिकार्यांकडून दिली गेली, असा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला.